रोहिंग्या आणि डान्सिंग विथ द स्टार्स...

एक घाणीने बरबटलेलं गटार, खरंतर रस्ताच. बाजूला झोपडपट्टी. समोर थोडी मोकळी जागा. निळ्या गणवेषातला एक पोलिस काठी आपटंत येतो. मोकळ्या जागेत खेळणारी मुलं उधळून पळतात. एक पांगळं मूल मागेच रखडतं. पोलिस त्याच्यावर काठी उगारून त्याला धमकावतो. कदाचित पोलिसालाही त्या मुलाची दया येते. त्या मुलाला तसंच सोडून तो पुढे जातो. ते पांगळं मूल तसंच गटारात पडून रहातं. त्याचे टपोरे डोळे पाण्याने भरतात. अश्रू नाही, ते संताप, दुःख, असहायता, अपमान ह्याने भरतात. कोणी लहानपणीच मोठं केलं ह्या लहान मुलांना?

.......रोहिंग्या. बांग्लादेश आणि बर्मा ह्यांच्यातल्या एका वादाचं कारण. बर्मामधल्या एका मुस्लिम जमातीला रोहिंग्या म्हणतात. ते आश्रित म्हणून बांग्लादेशात रहातात. ऑफिशियल नंबर बावीस हजार. विस्थापित, आश्रित, रेफ्युजी......

शाळा. शाळेत मुलं काहितरी घोकतायत. काहितरी नाही, इंग्लिश आहे ते. "आय ऍम समथिंग" असं काहिसं. एक पोरगेलसा शिक्षक शिकवतोय. चक्क लूंगी लावून. कारणंच तसं आहे. तो रेफ्युजी असल्याने त्याने पँट घालणं त्याच्या दर्जाला साजेसं नाही. लुंगी ऎवजी पँट घातल्यामुळे खाव्या लागलेल्या माराचे व्रण अजूनही त्याच्या पाठीवर ताजे आहेत.

......मुसलमान म्हणून ते बर्मामधे वेगळे काढले जातात. लोकशाही नाही, व्यक्तीस्वातंत्र्य नाही. बांग्लादेश मुसलमान देश, लोकशाही देश म्हणून रोहिंग्यांचे लोंढेच्या लोंढे बांग्लादेशात येतात. पण त्यांच्यासाठी तरी कुठे ते आपले आहेत? उपरे म्हणून त्यांच्यावर लोकांचा आणि सिस्टिम चा सुद्धा राग आहे.......

एक धडधाकट माणूस चक्क ढसाढसा रडतोय. त्याच्या बायकोसमोर, मुलांसमोर. मुलांना दोन वेळेला जेवायला पण मिळत नाही असं डोळ्यात आर्जव आणून आणून सांगतोय. तो एक भांडं दाखवतो. त्यात जेवण म्हणून बनवलेलं काहीतरी असतं. हे मिश्रण आणि भात. सकाळ संध्याकाळ हेच खायचं. तेसुद्धा जर पुरेशी धनधान्याची मदत मिळाली तर. वर पोलिसांचा मार आहेच. आता त्याच्या बायकोलाही रडू येतंय. पोरगं मात्र मातीशी खेळण्यात दंगलंय. एक बचाकभर माती उचलून ते सरळ तोंडात टाकतं.

......बावीस हजार रोहिंग्या बांग्लादेश बर्मा सीमेवरच्या रेफ्युजी कँप मधे रहातात. संयुक्त राष्ट्रांकडून हे कँपस चालवले जातात. पण अनधिकृतपणे बांग्लादेशात रहाणार्‍या रोहिंग्यांची संख्या एक लाखाहूनही अधिक आहे. त्यांना रेफ्युजी कँप मधे ज्या काही तुटपुंज्या सोयी मिळतात त्याही मिळंत नाहीत......

एक बाई आपल्या झोपडीसमोर बसलेय. तिची मुलं कसलासा पाला समोरच्या रानातून तोडून आणतात. तोच पाला ती शिजवतेय अन्न म्हणून. सात मुलं आहेत तिला. नवर्‍याला बर्मा मधे मारलं म्हणून ती मुलांना घेवून बांग्लादेशात पळून आली. पण ती अनधिकृत रेफ्युजी आहे. मुलं अधाशासारखी त्या पाल्याकडे बघतायत. ती बाई डोळ्यात असवं आणून सांगतेय. तिला आणि तिच्या नवर्‍याला बर्मिज सॆनिकांनी कॆदेत टाकलं. सतत बलात्कार. सातातली किती मुलं नवर्‍याची आणि किती दुसर्‍यांची हे सांगणंदेखील तिला शक्य नाही. तिला तिच्या मुलीची अशी अवस्था करायची नाहीये. चवदा वर्षाची आहे तिची मुलगी. पण तिला ती कुठेही जावू देत नाही. आजूबाजूचे लोक अचकट विचकट बोलतात, घरापर्यंत येवून तिला पाठव म्हणून धमकावतात.

.....रोहिंग्या लोकांविरुद्ध बांग्लादेशींमध्ये असंतोष खदखदतोय. ते स्वस्तात कामं करतात आणि स्थानिकांचा रोजगार पळवतात. ह्यामुळे स्थानिकांकडून त्यांना काही मदत मिळणं अशक्य आहे. सरकारही ते उपरे असल्याने त्यांच्यासाठी काहीही करू इच्छित नाही. बर्मा सरकारने तर त्यांचं राष्ट्रियत्व नाकारलंय. हा तिढा इतक्यात सुटण्याची चिन्ह नाहीत म्हणून मदत देणार्‍या देशांनीही हात आखडता घ्यायचं ठरवलंय. पण तरीही एक आशेचा किरण अद्याप आहे......

एका छोट्या हॉलमधे अनेक लहान लहान मुलं आणि त्यांच्या आया बसल्यायत. प्रत्येकीच्या हातात एक चंदेरी पिशवी आहे. ती एका बाजूने फोडून त्यातलं चाटण आया मुलांना खायला घालतायत. मेडिसिन सॅन्स फ्रंटियर्स (MSF) अर्थात डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स ह्या संस्थेचा एक स्वय़ंसेवक सांगतोय की रोहिंग्या विस्थापितांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे. कारण कुपोषण. म्हणून MSF तर्फे हे पोषक अन्न बालकांना दिलं जातंय. ते बालकांना तर आवडतंच आणि त्याचा पुरवठा करणंही तितकसं अवघड नाही. हळूहळू इथल्या बालकांचं पोषण ह्यामुळे सुधारेल.

......असा आहे हा तिढा. ना घरका न घाटका. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. एकोणिसशे नव्वद सालापासून लोक रेफ्युजी म्हणून रहातायत. पंधरा वर्ष झाली. लहानांचे तरूण झाले. त्यांनी बाहेरचं जग पाहिलंच नाही. तरूण उताराला लागले उद्याच्या आशेवर. म्हातारे मेले चांगल्या कबरीची स्वप्न पहात. पण बांग्लादेश, बर्मा आणि त्यांच्यातला हा तिढा आहे तसे आहेत. आणि रोहिंग्या आहेत कायमस्वरूपी रेफ्युजी......

निवेदक आपलं निवेदन संपवतो. श्रेयनामावली सुरू होते. आम्ही बघणारे मात्र सुन्न. कशा अवस्थेत लोकं रहातात? आणि आपण फालतू कारणांसाठी रडत असतो. हे विषय पण गुंतागुंतीचे. रोहिंग्या बांग्लादेशात रेफ्युजी. बांग्लादेशी भारतात रेफ्युजी. आणि भारतीय पश्चिमी देशांत. रेफ्युजी नसले तरी तसलंच काहीतरी. विचारांची वावटळ मनात सुरू होते.

इतक्यात श्रेयनामावली संपून जाहिराती सुरू होतात. मी चटकन भानावर येतो. घड्याळाकडे लक्ष जातं. साडेसात. मी जवळ जवळ किंचाळतोच बायकोच्या अंगावर. अगं "डान्सिंग विथ द स्टार्स" सुरू झालं असेल. तार्‍यांच्या भाऊगर्दीत रोहिंग्या अस्पष्ट होत जातात.