दिवाळी अंक २००९

आरटिकाया पोडी

वरदा वैद्य

वाढणी : दोन ते चार जणांस

जिन्नस :
कच्चे केळे - १
कांदा - १
चिंच - छोट्या लिंबा एवढा गोळा
तेल - अर्धी वाटी
चण्याची डाळ - ३ चमचे
उडदाची डाळ - १ चमचा
लाल मिरच्या - ५ वा तिखटाच्या आवडीनुसार
मीठ - चवीनुसार
कढिलिंब - ४-६ पाने
धने - २ चमचे
मिरे - ४-५ दाणे
मोहरी व जिरे फोडणीपुरते

मार्गदर्शन :
कच्च्या केळे सोलून त्याच्या बटाट्याच्या भाजीसाठी करतो तशा फोडी कराव्यात. कांदा जाड चिरावा. कढईत लाल मिरच्या, २ चमचे चण्याची डाळ, उडदाची डाळ, धने आणि मिरे एकत्र घेऊन डाळीचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावेत. कढईत अर्धी वाटी तेल तापत ठेवावे. तापले की कच्च्या केळ्याच्या फोडी फिक्या तांबूस रंगावर तळून घ्याव्यात व बाजूला काढून ठेवाव्यात. उर्वरित तेलात मोहरी घालावी व ती तडतडली की जिरे व कढिलिंबाची पाने घालावीत. त्या्वर १ चमचा चण्याची डाळ व कांदा घालून डाळ लाल रंगाची होईपर्यंत परतावे.
मिक्सरमध्ये वरील भाजलेले मिश्रण भरड दळून घ्यावे. त्यात केळ्याच्या तळलेल्या फोडी व चवीनुसार मीठ घालून फोडींचे छोटे तुकडे होतील इतपत दळावे. पार लगदा करू नये. त्यात वरून केलेली फोडणी घालून ढवळून घ्यावे.

अधिक माहिती :
आरटिकाया पोडी म्हणाजे तेलुगु पद्धतीची कच्च्या केळ्याची कोरडी भाजी. तेलुगूमध्ये आरटि म्हणजे केळे. आरटिकाया म्हणजे कच्चे केळे तर आरटिपंडु म्हणजे पिकलेले केळे. आंध्रात ही पोडी पांढर्‍या भाताबरोबर खातात. मात्र ही पोडी तशी कोरडी असल्याने पोळीशी वा भाताशी खाताना जोडीला आमटी वा दुसरे पातळ कालवण असल्यास उत्तम. नुसती खायलाही छान लागते.