दिवाळी अंक २००९

'मराठी पाउल पडते पुढे'

अक्षरांचे आकारमान

medium_saraswati.png

एकविसाव्या शतकातले हे पहिले दशक मावळतीकडे झुकले असताना महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सवही जवळ येतो आहे. पन्नास वर्षं हा तसा दीर्घ इतिहासातला एक छोटा कालावधी, पण स्वतंत्र राष्ट्रात मराठी भाषकांचे राज्य स्थापन झाल्याच्या महत्त्वपूर्ण घटनेमुळे महत्त्वाचाही. गेल्या पन्नास वर्षांच्या महाराष्ट्राच्या वाटचालीकडे आणि सद्यस्थितीकडे नजर टाकली तर काय दिसते?

१ मे १९६० रोजी झगडून मिळवलेल्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आल्यावर कितीतरी वर्षं राज्य प्रगतिपथावर होते. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत कारखानदारीने, शहरीकरणाने वेग घेतला होता. विकास व कायदा आणि सुव्यवस्था यांच्या दृष्टीने सार्‍या देशात अव्वल क्रमांकाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक होता. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात मराठी नावे अग्रक्रमाने झळकत होती. काही तुरळक अपवाद वगळता राजकीय वातावरणही स्थैर्याचे होते. सहकारी चळवळीने राज्यभर आणि त्यातही विशेषत्वाने पश्चिम महाराष्ट्रात चांगलेच बाळसे धरले होते. अर्थात, तेव्हाही राज्यासमोर समस्या होत्याच, पण त्यांचे स्वरूप आजच्याइतके आटोक्याबाहेर गेलेले नव्हते.

आजच्या घडीला चित्र काय आहे? खरे तर, बर्‍याचदा अशा सिंहावलोकनात प्रसंगी अनाठायी आत्मताडन करण्याकडे; भूतकाळाकडे स्मरणरंजनाच्या चष्म्यातून पाहून वर्तमान स्थितीबद्दल उसासे सोडण्याकडे कल असतो. पण तो मोह टाळला तरी सद्यस्थिती फारशी उत्साहवर्धक आहे अशातला भाग नाही. महाराष्ट्राचे देशातले अव्वल स्थान काही क्षेत्रांत तरी नक्कीच ढासळले आहे. इतर राज्यांनी भरून काढलेली पिछाडी हे एक कारण असले तरी दूरदर्शी नेतृत्वाचा आणि धोरणांचा अभाव हे त्यातले मुख्य कारण आहे.

आर्थिक क्षेत्रात आजही महाराष्ट्राचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात १४% वाटा असला तरी औद्योगिकीकरण आणि परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत गुजरात आणि तामिळनाडूने आघाडी घेतली आहे. सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक अनुकूल बाबी असूनही बंगळूर-हैदराबादच्या तुलनेत पुणे अद्याप बरेच पिछाडीवर आहे. एकंदरीतच मुंबई-पुणे-नाशिक ह्या सुवर्ण त्रिकोणाबाहेरच्या महाराष्ट्राची आर्थिक आणि औद्योगिक स्थिती फारशी चांगली नाही.

अर्थात, विकासाला मानवी चेहरा नसेल तर खर्‍या अर्थाने प्रगती झाली आहे असा दावा करणे चुकीचे ठरेल. नियोजन आयोगाच्या वार्षिक अहवालात म्हटल्याप्रमाणे जिथे ग्रामीण भागातील निम्म्याहून अधिक जनतेला पिण्याच्या पाण्याची सुलभ अशी सोय नाही तिथे महाराष्ट्राला विकसित, प्रगतीपथावरील राज्य म्हणताना जीभ चाचरते. शेतीची अवस्थाही हलाखीची आहे. विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या बातमीचे धक्का-मूल्य कधीच ओसरले आहे. औद्योगिक क्षेत्राबरोबरच देशाच्या कृषिउत्पन्नातील महाराष्ट्राचा वाटा घसरून आता जेमतेम सहा टक्क्यांवर आला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने दुसर्‍या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या राज्याच्या मानाने हा आकडा चिंताजनक आहे. शहरी भागांतील दिवसेंदिवस बिकट होत जाणार्‍या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबरोबरच गडचिरोलीसारख्या दुर्गम ग्रामीण भागात आता नक्षलवाद्यांनी पूर्वीपेक्षा कितीतरी मोठे आव्हान उभे केले आहे.

भाषा आणि सांस्कृतिक क्षेत्राची अवस्था हा फार मोठा विषय झाला. झपाट्याने मराठी तोंडवळा हरवत चाललेली शहरे; मातृभाषा आणि संस्कृती यांच्याबद्दलची वाढती अनास्था किंवा दुसर्‍या टोकाला अविचारी असहिष्णुपणा; साहित्यातल्या जुन्या दिग्गजांच्या जागा भरून काढण्यास समर्थ अशा नवीन लेखक-कवींची भासणारी चणचण; त्यापेक्षाही समाजाच्या सांस्कृतिक नेतृत्वाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी, दिशादर्शन करावे अशा समर्थ व्यक्तिमत्वांचा अभाव; वरवर विरोधाभासात्मक वाटल्या तरी एकाच समस्येच्या दोन बाजू असलेल्या भोगवादाला प्रोत्साहन देणार्‍या गोष्टी आणि त्याचवेळी नवीन बाबा-बुवा-बापूंचे फुटलेले पेव, प्रसिद्ध मंदिरांपुढे मैलोन्‌मैल लागलेल्या रांगा आणि त्यांत तासन्‌तास तिष्ठणारी माणसे; व्यासंगी संपादकांची परंपरा आणि वर्षानुवर्षं स्वतःचा वाचकवर्ग असणार्‍या वृत्तपत्रांनी धरलेली सवंग, उथळ पत्रकारितेची कास - एक ना अनेक.

अर्थात बदल हाच कुठल्याही समाजाचा स्थायीभाव असतो. गेल्या पाच दशकांकडे नजर टाकली तर घडून आलेल्या बदलांचे प्रमाण ह्या दशकात सर्वाधिक दिसेल. जागतिकीकरण हेच यामागचे प्रमुख कारण आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने आता इतका वेग घेतला आहे, ही प्रक्रिया आता इतकी सर्वव्यापी झाली आहे की तिचा स्वीकार करावा की नाही हा पर्याय आता जवळजवळ कुठल्याच समाजाला उपलब्ध नाही. आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या ह्या प्रक्रियेला तोंड देताना आपले वेगळेपण, आपली अस्मिता कशी जपायची हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. आणि भविष्यात त्याचे स्वरूप अधिकाधिक व्यापक होत जाणार आहे.

संस्कृतीच्या इतर अंगांतल्या बदलांबरोबरच भाषेतल्या बदलाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. इंग्रजीच्या वरवंट्याखाली अनेक भाषा आज लुप्त व्हायच्या मार्गावर आहेत. ही प्रक्रिया पुढे अधिक वेग पकडणार आहे हे नक्की. पुढच्या काही वर्षांचा विचार केला तर काय दिसेल?

रसेल पीटर्स हा भारतीय वंशाचा विनोदी कार्यक्रम सादर करणारा कलाकार म्हणतो, त्याप्रमाणे ही जागतिकीकरणामुळे होणार्‍या स्थलांतराची, वेगवेगळ्या वंशांचे लोक एकत्र येण्याची प्रक्रिया अशीच चालू राहिली, तर एक दिवस यामुळे वर्णभेद पूर्णत: नाहीसा होईल. कारण जगातले सारे लोक एकाच मिश्र रंगाच्या विविध छटांचे बनतील. विनोदाचा भाग सोडला, तर आता कुणालाच एकटे, स्वयंभू, विसाव्या शतकातील सार्‍या बारीकसारीक वैशिष्ट्यांसह न बदलता राहणे अशक्य होणार आहे या वास्तवाचा स्वीकार करणे भाग आहे.

परिणामी कदाचित काही शतकांनी, डार्विनने मांडलेल्या जीवसृष्टीच्या नियमाप्रमाणे, सध्याच्या हजारो भाषांपैकी केवळ आर्थिक आणि संख्याबळाच्या दृष्टीने सामर्थ्यवान असणार्‍या काही मोजक्या भाषाच मागे राहतील. आजच्या घडीला दहा कोटींच्या आसपास असणार्‍या समूहाकडून बोलली जाणारी, संख्याबळाच्या दृष्टीने जगातल्या पहिल्या वीस भाषांत गणना होणारी मराठी यापैकी एक असेल, मात्र तिचे स्वरूप - आपल्याला आवडो वा न आवडो - बदलत जाणार हे नक्की.

या महापुरात टिकून राहण्यासाठी विसाव्या शतकातील निकषांचा दुराग्रह धरणे योग्य होणार नाही. मराठीपणाची व्याख्या त्यासाठी विस्तारावी लागेल. ज्या सर्वसमावेशकतेच्या धोरणामुळे हिंदू धर्म वेगवेगळी आक्रमणे पचवून इतकी वर्षे टिकू शकला - भाषा आणि संस्कृतीबद्दलही तसेच डोळस धोरण स्वीकारणे भविष्यात भाग आहे. वेगवेगळ्या भाषांतील शब्दांना सामावून घेत दशलक्ष शब्दांच्या पलीकडे पोचलेल्या इंग्रजीचे उदाहरण यासंबंधात चिंतनीय ठरावे. अर्थात पाश्चात्यीकरणाला बळी पडावे, भाषेत बिनदिक्कत इतर भाषेतल्या शब्दांची भेसळ होऊ द्यावी असा याचा अर्थ नाही. पण या महापुराला तोंड देताना, लव्हाळीसारखे लवचीक धोरण स्वीकारणे भाग आहे. जे जे जपण्याजोगे आहे ते जपलेच पाहिजे यात काही वाद नाही, पण एकंदर 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डित:' हे ध्यानी ठेवून वाटचाल करणे भाग आहे.

ज्या जागतिकीकरणामुळे अस्मितेचा गाभा कायम ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे, त्याच्याच अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे मनोगतसारखी जगभरच्या मराठी भाषकांना एकत्र आणणारी, त्यांचा आपल्या संस्कृतीशी असणारा दुवा अखंड ठेवणारी संकेतस्थळे. दळणवळणाच्या सुधारित साधनांनी जसे जग जवळ आले, त्याचप्रमाणे मराठी संकेतस्थळे, आज हजारोंच्या संख्येने लिहिल्या जाणार्‍या जालनिश्या (ब्लॉग्ज), वृत्तपत्रांच्या महाजालावर उपलब्ध असणार्‍या आवृत्त्या, रेडिओ आणि टीव्हीवरील वाहिन्या इतकेच नव्हे तर संगणकाच्या प्रणालींत (ऑपरेटिंग सिस्टीम) आणि वापरात मराठीसारख्या स्थानिक भाषांचा होणारा वाढता वापर यामुळे आज जगभर विखुरलेले मराठी भाषक परस्परांच्या अधिक जवळ आले आहेत.

जागतिक पातळीवरचे हे तंत्रज्ञान स्थानिक पातळीपर्यंतही झपाट्याने पोचते आहे. आजवर अनेक कारणांमुळे भाषेच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला एक मोठा वर्ग मराठीत प्रथमच लिहू लागेल. त्याच्या अनुभवाच्या ताजेपणा आणि सच्चेपणा हाही एक नवा जोमदार प्रवाह मराठी साहित्यात येऊन मिसळेल. त्याच्या अभिव्यक्तीसाठी पारंपरिक माध्यमांबरोबरच जागतिकीकरणामुळे आज अनेक नवीन माध्यमांचे दालन खुले झाले आहे. नवसृजनाबरोबरच मराठीत आधुनिक ज्ञान आणण्यासाठी आणि आजवरचे संचित टिकवून ठेवण्यासाठी ते अतिशय प्रभावी ठरणार आहे. मनोगतसारख्या अनेक पणत्यांनी हा दाटू पाहणारा काळोख दूर होईल अशी आज दीपावलीच्या मुहूर्तावर आम्ही आशा बाळगतो आणि मनोगतचा हा तिसरा वार्षिक दिवाळी अंक आपल्याला सहर्ष सादर करतो.