तिरामिसु
जिन्नस :
२ अंडी
५० ग्राम साखर (साधारण २ टेबलस्पून)
२५० ग्राम मस्कार्पोन चीज
१५ ते १६ लॉफेल बिस्किटे /तिरामिसु करताची स्पेशल बिस्किटे (बिस्किटाच्या पाकिटावर तिरामिसु असे लिहिलेले असते.)
कोको पावडर साधारण २ ते ३ मोठे चमचे
२ चमचे रम/कोनिऍक/आस्बाख
१ ते २ कप कोरी कडू कॉफी (बिनादुधाची) मोक्का किवा एस्प्रेसो वापरली तर उत्तमच.
मार्गदर्शन :
अंड्यातील पांढरे व बलक वेगळे करणे व पांढरे फेटून घेणे.
अंड्यातील बलकात साखर घालून भरपूर फेटणे. इतके फेटणे की ऑफ व्हाइट रंग यायला हवा. त्या मिश्रणात चमचाभर रम घालणे. नंतर मस्कार्पोन चीज एकेक/दोनदोन चमचे घालत हळूहळू फेटणे. घट्टसर क्रिम किवा श्रीखंडापेक्षा जरा पातळ मिश्रण तयार होते. (अगदी चपखल सांगायचं झालं तर केकचे मिश्रण बेकिंगपूर्वी असते तशी कन्सिस्टंसी आली की फेटणे थांबवणे.)
आता त्या मिश्रणात फेटलेले पांढरे घालून नीट एकत्र करणे.
कोर्या कॉफीमध्ये चमचाभर रम घालणे.
एका चौकोनी/लंबगोल साच्यामध्ये लॉफेल बिस्किटे एकापुढे एक लावणे. नंतर त्यावर चमच्याने हळूहळू ती रमयुक्त कॉफी घालणे. बिस्किटे कॉफी शोषून घेतील. अशी सर्व बिस्किटांवर कॉफी ओतून झाली की मस्कार्पोनच्या मिश्रणातील काही भाग त्यावर घालून बिस्किटे पूर्णपणे झाकून टाकणे. परत लॉफेल बिस्किटांचा थर लावून त्यावर कॉफी चमच्याने घालणे. मग परत मस्कार्पोनचा क्रिमी थर देणे. बिस्किटे- क्रिम-बिस्किटे -क्रिम असे ४ थर एकावर एक येतील.
आता साचा फॉईलने झाकून सेटिंग साठी फ्रिझमध्ये ठेवणे. (फ्रिझरमध्ये नाही. जेली सेटिंगला जसे फ्रिझमध्ये ठेवतो तसे.)
६ ते ७ तास फ्रिझमध्ये ठेवून थंड करणे. वाढायच्या आधी थोडा वेळ त्यावर कोको पावडर भुरभुरणे.
थंड असताना वाढणे.
अधिक माहिती :
रम किवा तत्सम पेय न घालताही तिरामिसु करता येईल. मस्कार्पोन चीज आणि ही तिरामिसु बिस्किटे युरोप, अमेरिकेत उपलब्ध असतातच पण भारतातील मोठ्या मॉल्समध्ये किवा जेथे इटालियन पदार्थ बनवण्याचे सामान मिळते अशा दुकानातून उपलब्ध असतात.