पालक स्पघेटी
वाढणी : २ जणांसाठी पोटभरीची
जिन्नस :
पालक पाने - आवडीनुसार १ किंवा २ बचकभर
लसूण - १-२ पाकळ्या
ऑलिव तेल - ५ चमचे
कांदा - १
स्पघेटी
मीठ व मिरपूड चवीनुसार
ब्रोकोली व गाजर
मार्गदर्शन :
दोघांना पुरेल एवढी स्पघेटी उकळत्या पाण्यात (पाकिटावरील सूचनेनुसार) शिजत ठेवावी. पालकाची पाने धुवून चिरून घ्यावी. कांदा पातळ उभा चिरावा. लसूण बारीक किसून घ्यावी. धुतलेले गाजर बोटाच्या लांबीएवढे चिरावे. गाजराचे काप थोडे जाडच हवेत. बेबी कट गाजरे वापरल्यास गाजरांचे प्रत्येकी दोन भाग करावेत. ब्रोकोलीची फुले काढून धुवून घ्यावी.
एका पातेलीत ४ चमचे ऑलिव तेल घालून ते तापले की त्यात किसलेली लसूण आणि कांद्याचे काप घालून परतावे. कांदा अर्धा शिजला की पालक घालून परतावे. कांदा शिजला की शिजलेली स्पघेटी पाणी काढून घेऊन त्यात घालावी. चवीनुसार मीठ व मिरपूड घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे व एखाददोन मिनिटे शिजवून विस्तव विझवावा.
ब्रोकोलीची फुले व गाजराच्या फोडी एकत्र करून त्यात उरलेले ऑलिव तेल, मीठ व मिरपूड घालून ढवळून घ्यावे. मायक्रोवेव ओवन मध्ये सैल झाकण ठेवून २ मिनिटे वाफवून घ्यावे. ब्रोकोली व गाजराचा करकरीतपणा काही प्रमाणात शिल्लक राहायला हवा.
स्पघेटीवर वाफवलेली ब्रोकोली व गाजर घालून गरमागरम वाढावे.
अधिक माहिती :
बाजारात हल्ली मल्टीग्रेन व होल व्हीट स्पघेटी मिळतात, त्या वापरता येतील. आवडत असल्यास वरून किसलेले चीझ भुरभुरावे.