ग्रॅन्ड कॅनियन सहल-ग्रॅन्ड कॅनियन भेट

ग्रँड कॅनियन भेट


              पुढील चार तासाचा प्रवास वैराण भागातूनच होता. विविध आकारांचे पर्वत, दिसणाऱ्या खुरटया झुडपातील व कॅक्टसमधील वैविध्य हाच काय तो विरंगुळा होता. मातीचा रंग तांबडा पिवळा असा होता. मध्ये काही अंतरावर इंडियन विलेज किंवा इंडियन वस्तू मिळण्याची दुकाने रस्त्यालगत दिसायची. हे इंडियन म्हणजे अमेरिकेतील रेड इंडियन जमातीचे लोक. त्यांनी कलाकुसर करून विणलेल्या टोप्या, मण्यांच्या माळा आणि विविध प्रकारच्या काठ्या, प्राण्याच्या कातडीच्या शोभिवंत वस्तू व काही फळे अशांची दुकाने त्यांनी रस्त्यालगत थाटली होती. एकही पेट्रोल पंप, बर्गर किंग, मॅक्डॉन्ल्डस ही उपहारगृहे वा नेहमी आढळणारे वॉलमार्ट हे दुकान दिसले नाही. तीन तास गेल्यावर  खूप दूरवर काही निळ्या जांभळ्या पर्वतरांगा दिसू लागल्या. मावळत्या सूर्याची किरणे त्या पर्वतशिखरांवर पडल्याने रंगांची होणारी उधळण मनमोहक होती.


             'ग्रँड कॅनियन अमुक अमुक दिशेला आणि किती मैलांवर आहे ' अशी माहिती देणारे फलक दिसू लागले. जवळच्या गावात असणारी हॉटेल्स व उपाहारगृहे यांच्या जाहिरातीमोठ्या फलकांवर होत्या. तेथे जाणाऱ्या प्रवाश्यांना राहण्याची सोय करता यावी यासाठी त्यांचा उपयोग होतो.  बाहेर अंधारू लागले होते. आम्ही आमच्या खोलीवर पोहोचलो. आंघोळ करून गावात पायी फिरायला गेलो.


                 मॅक्सिकन जेवणात मक्याची पोळी, एखादी चवळीसारखी उसळ, कांदा, ढोबळी मिरची, कोंथंबीर, दही , परतलेल्या इतर भाज्या व भात असा समावेश असतो. जेवणाआधी मकयाच्या पापडांबरोबर झणझणीत अशी टोमॅटो, कोथिंबीर ,लसूण आणि कांद्याची चटणी असते. त्याला 'सालसा' असे म्हणतात. भारतीय जेवणाच्या जवळचे आणि त्या गावातील खास नावाजलेले म्हणून एका मॅक्सिकन उपहारगृहात त्या रात्री जेवण केले. गावातील हौशी कलाकारांचा एक ताफा तिथे होता. त्यांचे संगीत कितीतरी वेळ कानात रेंगाळत होते. मॅक्सिकन उपहारगृहात मिळणारे 'मार्गारिटा' हे खास शौकिनांचे आवडते मद्य आहे. संगीताच्या तालावर कित्येक अमेरीकन युगुले देहभान हरपून जेवणाचा आणि मद्याचा आस्वाद घेत होती.


          पहाटे उठून ग्रॅन्ड कॅनियनला सूर्योदय पाहण्याची इच्छा होती. ते शक्य झाले नाही तरी लवकर उठून आवरून तयार झालो. न्याहारी केली. जवळच असणाऱ्या एका दुकानात काही फळे, ब्रेड, जॅम आणि पाणी अशा जिनसा घेतल्या.  आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. अर्ध्या तासात आम्ही ग्रॅन्ड कॅनियच्या दक्षिणी भागाचा(साऊथ रीम) टप्पा गाठणार होतो. हा प्रवासमार्ग खूप प्रेक्षणीय आहे, अशा रस्त्यांना 'सिनीक ड्राइव्ह' असेच नाव अमेरिकेत आढळते.


              वळणादार नागमोडी रस्ते, काही घाट होते. तुरळक प्रमाणावर आढळणाऱ्या फळबागा होत्या. काही वेळा शेजारी येणारे पर्वत होते. तर कधी दूर दिसणाऱ्या निळ्या जाभंळ्या तांबड्या डोंगर रांगा पूर्ण रस्त्याभर आमचा पाठलाग करीत होत्या. ह्याच ग्रॅन्ड कॅनियनच्या रांगा. ग्रँड कॅनियन राष्ट्रीय उद्यान अरिझोना राज्यातील कोलोरॅडो पठारावर (प्लॅटूवर) आहे. अमेरीकेच्या त्या भागाचे वैशिष्ट्य असलेल्या उंचवटे व घळयांनी हा प्रदेश सजला आहे. पाण्याच्या प्रवाहानी दगडांचे सुळके तयार झाले आहेत. खूप उंचीवरील प्रदेशात जंगले आहेत.कमी उंचीवरील प्रदेशात वाळवंटी घळईंच्या रांगाच रांगा आहेत. ग्रँड कॅनियनमधील सर्वात खोल भागाची खोली साधारण ६००० फूट आहे.


             अमेरीकेतल्या सर्व राष्ट्रीय उद्यानात काही प्रवेश शुल्क आकारतात. सर्व उद्यानात वर्षभर उपयोगात आणता येईल असा एक 'पास' मिळतो. वाहनचालकाची माहिती दाखवून त्याच्या कुटुंबियाना वापरता येईल असे त्याचे स्वरूप असते. आम्ही तो पास व उद्यान्याची माहिती पत्रके घेतली. (टीप पहावी)


                  ग्रॅन्ड कॅनियनचा सर्व परिसर गजबजला होता. सगळीकडे निळ्या, जांभळ्या, तांबड्या रंगाच्या पर्वत रांगा दिसत होत्या. सूर्यकिरणे त्यांच्यावर पडून विविध रंग चहूबाजुला फेकीत होती. डोंगरांचे विविध आकार दिसत होते. त्या आकारांवरून त्यांना नावे दिली होती. त्यातील काही नावे 'ब्रम्हा टेंपल', 'विष्णू टेंपल' आणि 'शिवा टेंपल' अशी आहेत. ठिकठिकाणी कठड्यांची सोय करून छायाचित्रीकरण करता येईल अशी बांधणी होती. मोठे माहितीफलक होते. त्यावर विविध शिखरांची उंची, घळईच्या भागाची खोली, पर्वतात सापडणारी खनिजे, दगडांचे प्रकार यासर्वांची शास्त्रीय माहिती दिली होती.


              ग्रँड कॅनियनचा दक्षिण भाग समुद्रसपाटीपासून साधारण ७००० फूट उंचीवर आहे.  दूर्बीणीने दूरवर डोंगरातून घळया दिसत होत्या. त्यांच्या  कडेने जाणारा एक पाण्याचा प्रवाह वाहत होता. तो प्रवाह म्हणजे कोलोरॅडो नदी. ही नदी कॅनियनच्या काही भागातूनच दिसते. कॅनियनच्या वरच्या भागापासून थेट नदीपर्यंत जाऊन व तसेच वर चढून येण्यास साधारण दोन दिवस  लागतात.  तसे करणारी अगदी तरबेज मंडळी पहाटेच खाली उतरण्यास सुरूवात करतात. नदीकाठी रात्री मुक्काम करण्यास पूर्वपरवाना लागतो. अशी माहिती आम्हाला मिळाली.


         आम्ही 'डेसर्ट विह्यू ड्राईव्ह', 'रीम ट्रेल' नावाच्या पायवाटांनी जवळ जवळ सर्व दक्षिण भाग बघितला.  तसेच काही भाग गाडीने प्रवास करून आणि ठराविक पॉइंटचे दर्शन घेऊन आम्ही बघितला. दुपारी सूर्यप्रकाशात कॅनियनचे रंग थोडे फिकट दिसतात. सकाळी आणि संध्याकाळी ते खूप चमकदार असतात. डोक्यावर व दूर समोर निळ्या रंगाच्या विविध छटा दाखवणारे आकाश दिसते. त्याच्या पुढे नारिंगी, तांबडे, जांभळे, निळे, हिरवे अशा विविध रंगछटांची वळ्यावळ्यांची मखमल पांघरून उभ्या पर्वतशिखरांच्या रांगाच रांगा! यासर्वांमध्ये डोकावणारी काही तुरळक झुडपे आणि चिमुकली कॅक्टसची फुले! हे दृश्य पुन्हा पुन्हा पाहूनही मनाचे समाधान होत नव्हते. सगळे छायाचित्राच्या व फितीच्या स्वरूपात साठवले तरी कमीच होते.


           दुर्बीणीतून कोलेरॅडो नदीचा प्रवाह आणि डोंगरातील पायावाटा दिसत होत्या. तिथेच बराच वेळ राहावे असे वाटत होते.  ग्रँड कॅनियनला डोळ्यात साठवून आम्ही पुढील प्रवासास निघालो. वाटेतून एका बाजुने एक दीड तास त्याच तांबडया जांभळ्या पवर्तरांगा आणि दूरवर खोल वाहणारी नदी दिसत होती. आता आम्हाला वेध लागले होते"मॉन्युमेंट व्हॅलीचे".


सोनाली जोशी
यापुढे मॉन्युमेंट व्हॅली


टीपः(तुम्ही फक्त तीन राष्ट्रीय उद्याने एका वर्षी  बघितली तरी त्याची एकत्रित किंमत ह्या वर्षभराच्या पासच्या किमतीपेक्षा जास्त होते. त्यामुळे अशा मोठ्या सहली एकाच वेळी करणारे बहुधा तोच पास घेतात. त्यामुळे कोणत्याही उद्यानात कितीही वेळा जाण्याची सोय होते. )