ग्रॅन्ड कॅनियन सहल-झायन कॅनियन भेट

झायन कॅनियन


     झायन कॅनियन हे उटा राज्यातील सर्वात प्राचीन राष्ट्रीय उद्यान आहे. झायन त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहेच पण त्याच्या अनेक चिंचोळ्या घळयांसाठीसुद्धा.                


           झायन कॅनियनचे रुप ग्रॅन्ड कॅनियन आणि ब्राईस कॅनियनपेक्षा खूप वेगळे वाटले. झायनच्या मोहकतेमध्ये रौद्र रूप सामावले होते . कदाचित त्या प्रदेशात असणारे अजस्त्र दगड हे सुद्धा त्याचे कारण असू शकेल. झायन कॅनियन नजरेच्या टप्प्यात दिसू लागला तेव्हापासून पवर्ताच्या रांगा अवाढव्य होत गेल्या असे जाणवले. एवढेच नाही तर दगडांची भव्यता, त्यांचे अणकुचीदार सुळके यांनी आमचे लक्ष वेधले. एकूणच प्रदेशाची दुर्गमता ग्रॅन्ड आणि ब्राईसच्या तुलनेत आम्हाला अधिक वाटली.


                  झायन कॅनियन मध्ये आम्ही 'एंजल्स ट्रेल' नावाची मोठी पायवाट घेऊन एका उंच शिखरावर जायला सुरुवात केली. ह्या पायवाटेचे वर्गीकरण अवघड असेच केले होते. त्यामुळे आई बाबांनी तासभराने एके ठिकाणी थांबण्याचे ठरवले. साधारण चार तासात शिखरावर जाऊन परत येऊ असा आमचा अंदाज होता. सुरुवातीला वळण घेत जाणारा चढावाचा रस्ता होता. काही ठिकाणी दगडांच्या पायऱ्या होत्या. नंतर मात्र सगळा चढ आणि चिंचोळी दगडातून जाणारी वाट होती.


                 दीड तासानंतर आमच्या बरोबर थोडे लोक होते. काही सराईत मंडळी नंतर येऊनही आमच्या पुढे गेली होती. पाणी पिण्यासाठी व विश्रांतीसाठी आम्ही मध्ये मध्ये थांबत होतो. अवघड चढ आला किंवा घसरणारे दगड वाटेत दिसले की वर चढणारे एकमेकांना मदत करत होते. नुसते चढून जाताना दगडांची भव्यता व दुर्गमता जाणवत होती.  पण आजूबाजूला पाहिले की झायन कॅनियनचे  भव्य उंचवटे दिसत होते. काही शिखरे दिसत होती त्यामुळे झायन कॅनियनचे खरे दर्शन घडत होते.


                   शेवटचा टप्पा अगदी दृष्टिपथात होता. खाली पाहिले तर खालून जाणाऱ्या बसेस, माणसे अगदी छोटी दिसत होती. आम्ही घामाघूम झालो होतो आणि दमलो होतो.  शेवटचा टप्पा म्हणजे जणू एकमेकांवर रचलेले दगड होते. एका वेळी एका माणसाला एकच पाऊल ठेवता येईल एवढीच वाट होती. थोडा वेळ साखळीला धरून जाता येईल अशी सोय होती पण ती फक्त दहा पंधरा पावले! नंतर सगळा चढ स्वतः आपला भार (वजनदार माणसांना मी काय म्हणते ते कळेल) सांभाळत आणि अवधान राखून चढायचा होता. शेवटच्या टप्प्यावर गेलेली माणसे आनंद व्यक्त करत होती, एक समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. मी काही पावले पुढे गेले. अचानक खाली पाहताना आपला तोल गेला तर काय? असा विचार मनात आला! मग माझे हातपाय थरथर कापू लागले. कितीही प्रयत्न केला तरी मन पुढे जाण्यास तयार होईना..मी तेथेच थांबले.भावाने चिकाटीने सर्व चढ पूर्ण केला. त्यानंतर आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली तरी माझ्या हातापायाची थरथर पूर्ण थांबली नव्हती. याच जागेवरून मी पाचवर्षांपूर्वी अशीच परत फिरले होते...
          पळत पळत साधारण पाऊण तासात आम्ही सर्व अंतर उतरून खाली आलो. दमलो होतो पण झायनचे रौद्र रूप खूप जवळून बघण्याचे समाधान मनात होते.  झायनच्या उंच शिखरांचा निरोप घेतला.  आम्ही लासवेगासकडे निघण्याची तयारी केली.
-सोनाली जोशी


यापुढे- लासवेगासला परत