ग्रॅन्ड कॅनियन सहल- घरी सुखरूप परत

घरी सुखरूप परत
               विमानतळावर आलो. गाडी परत केली. आमचे सामान चेक ईन केले. तिकिटे घेतली. सुरक्षा व्यवस्थेतून आम्ही आमच्या विमानथांब्यावर गेलो. 'परतीच्या प्रवासात आता आणखी कोणते अनुभव येतात' या विचाराने मन धास्तावले होते.


                सुदैवाने आमचे विमान वेळेत सुटले. आम्ही भेट दिली, त्या सर्व पर्वत रांगा आम्हाला खाली बघितले की दिसत होत्या. ढगांच्या मखमलीवरून जाताना आम्ही खालचे रंगीबेरंगी पर्वत पुन्हा एकदा डोळ्यात साठवत होतो. विमानाने जशी आणखी जास्त उंची गाठली तसे खालचे दृश्य धूसर होत गेले.


                 प्रत्येक कॅनियन मनसोक्त भटकत पहायचा म्हटला तर कमीत कमी चार दिवस तरी प्रत्येक कॅनियनला द्यावे लागतील. भारतभेटीसाठी सुटी साठवून ठेवायची असते त्याने असे करणे शक्य होत नाही. त्यामुळे होते ती धावती भेट. साडेतीन दिवसात सगळे कॅनियन बघण्याकरता लासवेगासहून जाऊन येऊन आम्ही १५०० मैलांचे अंतर गाडीने कापले होते. सर्व बघण्याच्या नादात थकवा तेवढा जाणवला नसला तरी आता छान झोप काढावी असे वाटत होते. घरी परतण्याचे वेध लागले होते ते वेगळेच.


              दर सहलीनंतर आणखी काही काळ थांबलो असतो ते काय काय पाहिले असते त्याची चर्चा होतेच. ही सहलही त्याला अपवाद नव्हती.  कॅनियनच्या जवळपासच्या भागात असणारी नॅचरल ब्रिजेस ऍन्ड आर्चेस सारखी इतर ठिकाणे जास्त दिवस असते तर बघता आली असती. मला स्वतःला ब्राईस कॅनियन जास्त आवडला होता. तिथे जास्त काळ घालवणे आवडले असते.


        विमान धावपट्टीवर उतरते आहे अशी घोषणा झाली आली माझी विचार श्रृंखला भंग झाली. विमानतळावरून आमचे सामान घेतले. गाडीने आम्ही घरी निघालो. 


          सहलीची छायाचित्रे व चित्रण पहातांना त्या अनुभवाची उजळणी होत होती. रंगीबेरंगी पर्वतरांगा आमच्या मनात कायमचे घर करून होत्या.


           खालील  दुव्यावर  ह्या स्थळांना भेटी देण्याविषयक माहिती आणि छायाचित्रे दिली आहेत. ती माहिती वाचकांना उपयोगी पडेल असे वाटते. या छायाचित्रांचे सर्व हक्क त्याच संकेतस्थळाकडे आहेत याची नोंद घ्यावी.                   



  1. ग्रॅन्ड कॅनियनची काही चित्रे 
  2. मॉन्युमेंट व्हॅली छायाचित्रे
  3. ब्राईस कॅनियन छायाचित्रे 
  4. झायन कॅनियन छायाचित्रे - या दुव्यावर 'झायन फोटो टूर' येथे टिचकी मारा. 
  5. लासवेगास छायाचित्रे

-सोनाली जोशी