ग्रॅन्ड कॅनियन सहल-ब्राईस कॅनियन भेट

ब्राईस कॅनियन


              जून महिना सुरू होत होता तरी बाहेर तापमान ३५डिग्री फॅ. होते. बरोबर घेतलेले लांब बाह्यांचे कपडे आणि स्वेटर्स चढवले होते तरीसुद्धा गारवा जाणवत होता.


                यूटा (दक्षिणेकडे याचा उच्चार उटा असा ऐकला आहे)राज्यात असलेला ब्राईस कॅनियन त्याच्या 'ऍम्फिथिअटर्स' करता प्रसिद्ध आहे. घोड्याच्या नालेच्या आकाराचे असे अनेक ऍम्फिथिअटर्स एकमेकालगत पठारावर तयार झाले आहेत. जमिनीची धूप व वातावरणाच्या परिणामाने असे अनेक आकार निर्माण होतात. त्यामुळे रंगीबेरंगी असे चुनखडक(लाईमस्टोन), वालुकाश्म(सॅन्डस्टोन) आणि मुरूमाचे दगड विविध आकारात बदलले आहेत.काही रंगीबेरंगी उभट आणि वलीय सुळके आहेत. तर काही पसरट (फीन्स)शिखरे आणि इतर एकमेकात गुंतलेले आकार जागोजागी तयार झाले आहेत.


        ब्राईस कॅनियन पाहण्यासाठी छोट्या पायवाटा आहेत. ह्या सर्व विविध आकारांना जवळून पाहता यावे म्हणून अनेक ठिकाणी विशेष जागा तयार केल्या आहेत.  पायवाट उंचावरून सुरू होते. तयार झालेल्या विविध आकारांच्या पायथ्यापर्यंत अनेक दिशांनी जाते. ह्याच छोट्या पायवाटा (ट्रेल्स).                     


                  एका ठिकाणी आम्ही उभे राहिलो. नजर जाईल तेथे गोलाकार पसरलेले गुलाबी, लाल, तांबडे, जांभळे असे नानाविध रंगाचे व आकारांचे सुळके दिसत होते. काही वळ्यावळ्याचे होते, काही ओबडधोबड होते तर काही पसरट होते. काही सुळके  अणकुचीदार होते.  काही वळ्यांनी एकमेकांत अधिकच गुंतलेले. अशा ह्या वळणावळणाचे सुळक्यातील पहिले वळण किंवा वलय कुठे असावे ते शोधताना नजर खाली घळईत कितीतरी फूट खोलवर जात होती.


          आम्ही उभे होतो ते एक मोठे 'ऍम्फिथिएटर' होते. ह्या जागेचे वैशिष्ट्य असे की तुम्ही गोलाकार नजर टाकली की तुम्हाला सभोवती हे विविध आकार दिसतात. तुम्ही गोलाकार चित्रपटगृहात बसले आहात अशी कल्पना करा. अगदी वरच्या रांगेपासून बघितले असता जशा खालच्या रांगेतल्या खुर्च्या दिसतात तसेच अशा आकारांचा भलामोठा पट्टा किंवा समूह जास्त उंचीवरून कमी उंचीकडे जातो आहे असे भासते. असे अनेक पट्टे आम्हाला दिसत होते.


         ब्राईस कॅनियनच्या काही भागांची उंची समुद्रसपाटीपासून साधारण ६००० ते ९००० फूट आहे. त्यामुळे चढावावर धाप लवकर लागते.  सर्व वलीय सुळके जवळून पाहता यावे म्हणून आम्ही एक पायवाट निवडली. उत्साहाने आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. वेगवेगळ्या सुळक्यांचे रंग आणि वैशिष्ट्ये बघत होतो. जेवढी छायाचित्रे घेतली तेवढी कमीच वाटत होती. सगळे पाहण्याच्या नादात आम्ही बरेच अंतर उतरून गेलो. माती भुसभुशीत होती. उतरताना वेग कमी राहावा या प्रयत्नात गुडघ्यावर जोर येत होता. वर चढून येताना मात्र आमची दमछाक झाली होती. त्याचा एक फायदा झाला तो म्हणजे आम्हाला थंडी वाजणे कमी झाले होते. पुढे त्याच दिवसात झायन कॅनियनवर आणखी एक मोठी पायवाट चढायची होती त्यामुळे आम्ही ब्राईसमधील 'हायकिंग' आवरते घेतले. आमच्या बरोबर अमेरिकन आणि इतर एशियन सहप्रवासी खूप होते. त्यात अशा पायवाटांवर चढ उतर करणाऱ्यात फक्त अमेरिकनांचा अग्रक्रम होता. क्वचित एखादा भारतीय विद्यार्थ्यांचा गट अशा मोहिमेत दिसत होता. हीच गोष्ट मला माझ्या आधीच्या सहलीतही प्रकर्षाने जाणवली होती.
-सोनाली जोशी
यापुढे झायन कॅनियन भेट
काही भौगोलिक मराठी शब्द सुचवणीसाठी वरदाताईंचे आभार