माझ्या संग्रहातील काही आर्या.... भाग १

लहानपणापासून पाठांतऱात असणाऱ्या काही आर्या मनोगतींसाठी देण्याचा विचार आहे. खरे तर हा कवितांचा प्रकार! तेव्हा कविता विभागात द्यावा असे वाटले होते. पण नंतर लक्षात आले की या नुसत्या आर्या देऊन भागणार नाही. त्यांचा अर्थ आणि संदर्भ सांगणे देखील भाग आहे. आणि हे कविता विभागात कितपत रुचेल असे वाटल्यावरून गद्य विभाग निवडत आहे. 

आर्या म्हटले की 'आर्या मयूरपंतंची' ही ओळच आठवते. पण मी देणार असणाऱ्या या आर्या नेमक्या कुणाच्या आहेत मला माहित नाही. या नेमक्या सुसंगत देखील नाहीत. कधी त्या महाभारताच्या संदर्भातील असतील तर कधी नलदमयंती आख्यानातील.  कधी त्यांचा संबंध कुठेच नसेल.  या आर्यांची संख्या देखील मोठी असल्याने हप्त्या- हप्त्याने देण्याचा मानस आहे. मनोगतींना त्या आवडतील असा विश्वास वाटतो. महाभारतासंबंधातील आर्यांचासुद्धा क्रम सांगता येणार नाही. थोडक्यात हा नुसताच संग्रह आहे, हे ध्यानी घ्यावे.

१. गरूड जसा गगनातूनी वेगे उतरोनी पन्नगा झडपे,

     तैसा भीम बळाने दुःशासन कंठ अंघ्रीने दडपे /

पन्नग म्हणजे साप (पन्न = शरीराची एक बाजू, ग= जाणारा ) शरीरानेच पुढे सरकणारा तो सर्प!

अंघ्री= हाताचा किंवा पायाचा अंगठा; येथे हाताचा

भीमाने दु:शानाला कसा मारला त्याचे वर्णन आहे. गरूड आणि साप यांचे वैर प्रसिद्ध आहे. ज्या वेगाने गरूड सापाला पकडतो, त्याच वेगाने आणि जोराने भीमाने दु:शासनाचा गळा (कंठ) हाताच्या अंगठ्याने दाबला.

२. भीम म्हणे मातेला, ब्राह्मण समुदाय रडती का पूस/

     त्यांचे दुःख हराया अग्नीला भार काय कापूस?

बकासूर-वधाशी संबंधीत ही आर्या आहे. पुसणे= विचारणे.

  एकचक्रा नगरीत आल्यावर,भीम कुंतीला म्हणतो, ब्राह्मण का रडताहेत ते विचारून ये. त्यांचे संकट मी दूर करेन. जसा अग्नीला कापूस जाळण्याला काहीच त्रास होत नाही तसाच मला देखील त्यांचे दुःख दूर करायला काही ही त्रास होणार नाही. येथे 'कापूस' शब्दावर सुंदर यमक साधले आहे.

३. कितीशी आणाल माती, बळ तुमचे हे कितिक पाचांचे,

    भीम म्हणे मी असता नाम वदावे किमर्थ पाचांचे?

एकदा गांधारीने मातीचा हत्ती बनवून, त्याची पूजा केली व गजगौरीचे आपले व्रत पुरे केले. त्यासाठी तिच्या शंभर पुत्रांनी तिला माती आणवून दिली होती. गांधारीचे पाहून कुंतीने देखील तेच व्रत करायचे ठरविले व आपल्या मुलांना माती आणावयास सांगितले. ते ऐकून दुर्योधन चिडवण्यासाठी पांडवांना म्हणाला, " आणून आणून किती माती आणाल -सगळे मिळून पाच जण तुम्ही! आम्हा शंभरांची बरोबरी थोडीच करू शकणार? " त्यावर भीम उत्तरतो, "अरे पाच जण हवेतच कशाला? मी एकटाच पुरेसा आहे ना!"

आज एवढेच! 

प्रशासकांसाठी- हे लेखन कविता विभागात उचित वाटत असेल तर प्रशासकांनी ते कविता विभागात दाखल करावे, माझी हरकत नाही.