माझ्या संग्रहातील काही आर्या... भाग ३

१. गंगे गोदे यमुने, माझा नोहे, तुझाची हा बाळ /

      जतन करी गे ह्याते, स्वाधीन केला न कापिता नाळ/

कुंतीने विवाहापुर्वी झालेले बाळ नदीत सोडून दिले. त्या वेळी ती  नद्यांना विनवणी करित आहे, या बाळाचा तुम्हीच सांभाळ करा.

२. अंध म्हणे रे संजय, हे त्या पौत्रासी वर्ष सोळावे/

     लोळावे मांडीवरी, तेणे द्रोणादिकांसी घोळावे/

पौत्र = नातू (अभिमन्यू हा अर्जूनाचा मुलगा, म्हणजे धृतराष्ट्राचा नातू)

व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली होती. तिचा वापर करून विदूरपूत्र संजय धृतराष्ट्रास महाभारतीय युद्धाचे धावते वर्णन कथन करायचा. आज तो अभिमन्यूचा पराक्रम सांगत असताना धृतराष्ट्र प्रभावित झाला. व म्हणाला, " अरे हा अवघा सोळा वर्षाचा पोर, अजून मांडीवर लोळण्याचे या पोराचे वय! हा द्रोणासारख्या कुशल योद्ध्यांनादेखील भारी पडत आहे!"