माझ्या संग्रहातील काही आर्या... भाग २

आज अणखी एक आर्या-

एक कावळा होता. चांगल्याच बळकट पंखांचा! उडण्यात कुशल. त्याच्या अनेक जातभाईंना तो लीलया हरवत असे. आता त्याला झाली 'ग'ची बाधा. त्याने एका राजहंसाबरोबर समुद्र पार करण्याची शर्यत लावली. राजहंसाचे ते नित्याचेच काम. त्याने 'हो' म्हटले. शर्यत सुरू झाली. कावळा हिरिरीने उडाला. राजहंसापेक्षा कितीतरी वेगाने! जाताना अनेक कसरती देखील केल्या. एकदम उंच आकाशात, तर एकदम दुसऱ्या क्षणी एकदम खाली! उलटसुलट करामती देखील दाखवल्या. एव्हाना तो समुद्राच्या मध्यभागी आला होता. आणि मग?

न दिसे अग, नग, मग तग गगनी नीच काय काढील?

चित्ती म्हणे समय हा मज काळाच्याही मुखात ओढील!

अग = (कुठे ही न जाणारा) = खडक,  नग = (न जाणारा) = पर्वत,  तग = धीर, खग= खग (आकाशातून जाणारा, ख= आकाश)

कुठे खडक दिसेना, कुठे पर्वत दिसेना; विश्रांती साठी खाली उतरताच येईना! आता काय? मृत्यू शिवाय काय पर्याय! चांगलीच गाळण उडाली. थोडक्यात  आपला आवाका ओळखावा. भलतीच पैज अंगाशी येऊ शकते; हा धडा!