काय करू?

"हॅल्लो स्वीटी..! "

ह्याच शब्दाने चालू होणारा फोन घेण्यासाठी ती गेले काही महिने अगदी आतुर होती... म्हणजे थोडक्यात सकाळी हा फोन आला नाही तर दिवस चांगला जाईल का नाही? आणि हा फोन रात्री आला नाही तर रात्र छान जाईल का नाही? हे प्रश्न पडावे एवढी आतुर...

-- "प्रेमाची भानगड असेल".... अरे, लगेच असा निष्कर्ष काढून मोकळे काय होता? ऐका तरी काय सांगतोय ते..

तर, ही मुलगी... तशी सुंदर, सुस्वभावी आणि व्यवहारी... परंतु तेवढीच चूझी.... आपले मित्र निवडणे, कोणाला किती अंतरावर ठेवणे हे सगळे ज्ञान जणू तिला विधात्याने उपजतच अर्पण केले होते... अनेक दिवस घराबाहेर राहूनही असेल कदाचित... पण, स्वतःची जबाबदारी घेणं.. पेलणं तिच्या अंगवळणी पाडलेलं होत... शिक्षण चालूच होतं, आणि त्याचबरोबर 'वर' संशोधन देखील...

ठराविक वयानंतर स्वतःच्या तोला-मोलाचा मुलगा पाहणे, त्याला पसंत करणे किंवा नकार देणे हे खरे तर मुला/मुलींच्या नित्य नियमात असते.. काही दिवस मजा वाटते... पण मग नंतर नंतर त्याच तिकिटावर तोच खेळ बघायचा कंटाळा यायला लागतो... शिक्षण किती... वय किती... पगाराच्या अपेक्षा काय... मुख्य म्हणजे जात कोणती? पोट-जात काय? मंगळ आहे की नाही? घर.. पक्की नोकरी... गाडी... घरची माणसे इ. इ.   सवयीचे प्रश्न विचारले जातात आणि इंटरव्यू ला आल्याप्रमाणे सर्व प्रश्नांची जशी तयारी केलेली असते तशी उत्तर दिली जातात... पण मग अनेकदा सगळे प्रश्न हवे तसे उत्तरले जातात/जात नाहीत... गोष्ट बाकी राहते ती एका 'क्लिक' ची!

अमर-अकबर-अँथनी मधला अमिताभ सांगतो तेच खरं, "दिमाग मे घंटी बजना चाहिये... " मग हिच घंटी कधी हो म्हणते तर कधी सगळ्या प्रश्नांची हवी तशी उत्तरे मिळून देखील हेरा-फेरी मधल्या सुनील शेट्टी सारखी "गोलमाल है भाई सब गोलमाल है" असे गाणे ऐकवते...

तर ही मुलगी देखील अशीच, उच्चशिक्षित, मध्यम उच्चभ्रू घराण्यात वाढलेली, थोडीशी हट्टी, रागीट, चिडखोर पण बिघडलेली मात्र नाही...   आपल्या आयुष्याचा जोडीदार शोध चालू ठेवून उरलेले शिक्षण पूर्णं करत होती... लग्न तर करायचे आहेच, पण इतका आटा-पिटा का चालला आहे हे न कळून किंवा कळूनही ही गोष्ट अमान्य होती, त्याला कारणही तसंच - जो उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू मुलगा सांगून येतो तो ७-८ वर्षांनी मोठा ( आताच्या मुली अंकल कॅटॅगरी असे म्हणतात.. ) मग तो सुद्धा रीतसर एखादी बिझिनेस डील केल्यासारखे बघण्याचा कार्यक्रम करतो आणि तेच प्रश्न तीच उत्तरं..! ह्या सगळ्याला थोडी कंटाळली होती ती आणि त्याहूनही जास्त चालीरीती/जात-पात ह्यांच्या रिस्ट्रिक्शन्स ला वैतागली होती...

असेच एकदा काय कोण जाणे, सोशल नेटवर्किंग साईट्स ची ओळख झाली.. तिथे अकाउंट ओपन करून तिने आपल्या चिक्कार जुन्या मित्रमंडळींना शोधले... हो, कॉलेजमध्ये असताना नेहमी ज्याच्यासोबत नाव जोडले जायचे... मित्र-मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये कायम चिडवा चिडवी व्हायची... व्हॅलेंटाइन डे ला आवर्जून कॉलेजातल्या सगळ्यांचं लक्ष 'तो' आणि 'ही' काय बोलतात किंवा ह्यांच्यामध्ये काही होणार का नाही ह्याकडे असायचं... अगदी हिच्या घरच्यांशी पण त्याच वागणं चांगलं होत.. मिळून मिसळून, न जाणो तिच्या घरी पण हा आवडला असावा... पण तेव्हा सुद्धा पहिले काही दिवस निखळ मैत्री, मग छान मैत्री, मग अर्धवट प्रेम आहे की नाही हे कंफ्युजन आणि ह्यातून बाहेर पडण्या अगोदरच त्याने सांगितलेले वाक्य 'आपण मित्र आहोत ग.. लग्न वगैरे असा काही विचार पण केला नाहीये.. " आणि त्यानंतर हळू हळू दुरावलेली मैत्री....

तो देखिल भेटला ह्या मायाजालावर - एकमेकांची प्राथमिक चौकशी केल्यावर पुन्हा गाडी जुन्या रुळावर धावणार की काय? असे वाटायला लागले परंतु ह्या वेळी मात्र त्याने पुढाकार घेतला.. त्याने विचारायला सुरुवात केली - 'ती' तर थक्कच झाली की माणूस दोन वर्षात एवढा बदलतो? आज अचानक त्याला माझ्यात असे काय दिसले जे २ वर्षांपूर्वी नव्हते?   आता तो परत जवळीक करायला लागला की हिच्या डोक्यात 'हेरा-फेरी' ची घंटी वाजते... मग ती तरी कसे काय ऍडजस्ट करणार..

! " --- नाही! उगीच जुन्या आठवणींना ओल देण्यात अर्थ नाही... तू दिसलास, आपण मित्र होतो म्हणून तुला ऍड केले.. बाकी आता मला काहीही रस उरला नाही... जे झालं ते झालं.. आता दोघही आपापल्या वाटेने पुढे जाण्यातच भलाई आहे... " -- --  ह्या धारदार शब्दांनंतर मात्र त्याने ह्या गोष्टीला पुन्हा छेडले नाही... त्याने 'तीच्या घरच्यांशी अजूनही सलोखा ठेवला आहे. पण 'ती मात्र मैत्री ह्याच भावनेतून ह्या सगळ्याकडे पाहत आहे... आणि तसेच तिने घरच्यांना देखील कळवले की आता कृपया परत गळ घालू नका...

असो,

आतापर्यंतचं सगळं बॅकग्राउंड किंवा फ्लॅश बॅक म्हणा हवं तर... कारण खरी गोष्ट पुढेच आहे..

तिला काही दिवसांपूर्वी एक निनावी फ़्रेंड रीक्वेस्ट आली... त्या प्रोफाइल चा मालक कोण हे जाणून घ्यायला तिने म्युच्युअल फ़्रेंड्स लिस्ट पाहिली... तिची जुनी मैत्रीण जी अगदी हायऱ्हेल्लो कॅटॅगरीतली... तरी तिने ऍड केले...! आणि अनेक दिवस काहीच रिप्लाय नाही... थोड्या महिन्यांनंतर तिला जनरल, डे टू डे लाईफ मध्ये आपण गप्पा मारतो तसे चॅट मेसेज यायला लागले... आणि मग हळू हळू ते चॅट कसे वाढत गेले कळलेच नाही... ना तिला... ना त्याला...!

चॅटिंग करता करता एकमेकांबद्दल ओळख करून घेतली गेली, आवडी-निवडी, दैनंदिन कार्यक्रम, घडामोडी, इ. इ. वर गप्पा होत गेल्या...   फोटो पाठवले गेले.... व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण... तासन-तास गप्पा मारून पोट भरेना म्हणून की काय त्याने तिला फोन नं मागितला...

अर्थातच तो पहिल्या झटक्यात मिळाला नाहीच... अनेक दिवस तश्याच गप्पा चालू राहिल्या तो २-४ दिवसांनी आठवण करून द्यायचा की अजूनही फोन नं शेअर कर की गं.... एक दिवशी असंच गप्पा मारता मारता तिला काय क्लिक झाले... तिने नंबर दिला.. आणि त्यानंतर...

(नाही --एसेमेस/एमेमेस/फोन करून त्रास देणे,   वगैरे असले काही प्रकार घडले नाहीत... ) जवळ जवळ आठवडाभर "त्याने" तिला फोन केला देखील नाही... जणू नंबरच नव्हता... --- त्याला तिच्यामध्ये स्वतःविषयी आत्मविश्वास निर्माण करायचा होता कारण तिने देखील तो नंबर अतिशय विश्वासाने दिला होता... एके रात्री असेल बोलणे चालू असताना त्याने विचारले मी कॉल करणार होतो पण रात्र खूप झालीये, आता माझा नंबर देतो मिस कॉल..... आणि त्या रात्रीत इकडून तिकडे जवळ जवळ १० मिसकॉल्स शेअर झाले..

फोन केल्यावर काय बोलावे सुचेना, पण जे चॅट वर तेच फोन वर असे समजून त्याने रोजच्या प्रमाणे गप्पा मारायला सुरुवात केली.. आणि तिलाही कोणा फालतू माणसाला नंबर न दिल्याचा आनंद झाला.

दिवसांमागून दिवस जात होते... ओळख घट्ट होत होती, मैत्री फुलत होती आणि एक जवळची मैत्रीण/मित्र हा हुद्दा त्यांनी एकमेकांना बहाल केला देखील...

तो तिच्याशी नेहमी गोड बोलायचा, तिची सगळी गाऱ्हाणी ऐकायचा, जमल्यास ती आपल्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा, जमले तर १००% नाहीच जमले तर ५०% तरी तिचा मूड जोवर कॉल चालू आहे तोवर टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करायचा... अर्थात हेच कारण त्यालाही लागू होते.. कारण हा सुद्धा तिच्याशी बोलून एकदम रिलॅक्स व्हायचा... दिवसभर ऑफिसमध्ये कटकट करून घरी आल्यावर चहा घेताना किंवा उद्या ऑफिस ला पुन्हा तोच वैताग, चला निदान आतापुरता हा सकाळचा चहा तरी मस्त हुशारी आणून देईल... ह्या भावनेमागचे रिलॅक्सेशन तो अनुभवायचा..

एकमेकांना मनापासून पसंती होतीच, मैत्रीची... 'ती' एकदा बोलता बोलता म्हणाली 'तू एवढा का रे चांगला आहेस? मी प्रेमात पडेन बरं का... "  ---- --  नको गं, प्रेमाबिमात नको पडूस.. मी एवढाही चांगला नाहीये.. -- हे त्याचे उत्तर..!

लाडिक शब्द हे दोन जिवांना एकत्र/जवळ आणण्यासाठी मोठे कारक ठरतात... आधी नुसते हेल्लो, मग हाय डिअर.. मग हेल्लो बेबी... मग स्वीटी... आणि शेवटी हे स्विटी... इथवर येऊन पोचले..

दोघांना माहीत होते की लग्न संस्थेच्या निकषात आपले हितसंबंध बसत नाहीत.. त्यातही 'तो' प्रेमात पडू नको म्हणतो आणि 'हि' तू कोण सांगणारा? मी प्रेमात पडली आहेच.. तुला पडायचं की नाही हा तुझा निर्णय असे म्हणणारी..  

(अजब प्रेम की गजब कहानी शीर्षक असेच कसेतरी सुचले असणार... )

एकमेकांबद्दल वाटणारी ओढ-- फक्त शारीरिक किंवा मानसिकच नाही.. पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असे वाटून गेले की ह्या मुलीची/मुलाची ओळख पाळख नव्हती... तरी आपण इतके बोललो... भावनिक अर्थात सारासार विचार करूनच पण गुंतत गेलो.. तर ही व्यक्ती नक्की आहे तरी कशी? भेट कधी होणार? निदान एकदा तरी भेट झालीच पाहिजे... एकमेकांवर एवढा विश्वास ना त्याने आधी कोणावर ठेवला होता ना तिने... त्याला तर आश्चर्यच वाटत होते... स्वतःवर एवढा विश्वास कोणी ठेवू शकेल हे त्याच्या ध्यानी मनी देखील नव्हते....

परंतु भेट ठरवून देखील काही कारणास्तव ती पुढे ढकलली जात होती... ह्यामध्ये अनेकदा एकमेकांवर लटका राग-चिडचिड-प्रेमळ गप्पा.. हट्ट... समजूत काढणे.. आणि एकमेकांसाठी डोळ्याच्या कडांवरून पाण्याचे थेंब ओघळून टाकणे झाले..

"हाय स्विटी" मी पोचलो.. तू कुठे आहेस? असे म्हणत एकदा तो तिच्या घरी गेला सुद्धा... ती देखील त्याच विश्वासाने त्याला भेटली... काही तास एकत्र घालवून त्यांनी एकमेकांना अजून जाणून घेतले... गप्पा मारल्या... प्रेम-मजनुगिरी-लग्नसंस्था-एकमेकांच्या मित्र मैत्रिणींच्या नावाने चिडवा चिडवी इ. इ.  खोड्या काढल्या.

आणि परत जाताना तिने त्याला सांगितले --> मी एका मुलामध्ये ईंटरेस्टेड आहे... त्यानेही मला प्रपोज केले आहे... आपल्याप्रमाणेच त्याची आणि माझी भेट झालीये.. प्रत्यक्षात अजून भेटले नाहीये... पण तो जवळपास ८ वर्षाने मोठा आहे... शिक्षण जेमतेम आहे... जात माहीत नाही.. आणि घरची परिस्थिती पण नॉर्मलच आहे... पण त्याने मला खूप स्वप्ने दाखवली आहेत... खूप Promising ahe तो.. काय करू?

--तो म्हणाला " तू सुज्ञ आहेस, स्वतःचा निर्णय घेऊ शकतेस, एकच सांगतो.. आई वडिलांना दुखवू नकोस.. अगदीच निर्णय ठरला असेल तर पुन्हा एकदा शांतपणे विचार कर...  तू काय लगेच लग्न करत नाहियेस ना? मग जे काही ६-८ महीने तू ठरवले आहेस त्यामध्ये Think wisely... & accordingly take a call... प्रत्येक वेळी निर्णय क्षणात देता येत नाही. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय दीर्घायुष्यात डोळे ओलावतात... आणि योग्य निर्णय जर लांबवले तर आपण आयुष्यभर 'चुकलो' हे खडे फोडावे लागतात... त्यामुळे स्वतःच्या सदस्द्विवेकाला जागून आणि सारासार विचार करून निर्णय घे... --- >

*विषय सीरियस होत गेलेला "त्याच्या ध्यानात आला आणि वातावरण मोकळे करायला तो म्हणाला...

-- "आणि अगदीच जर कोणी नाहीच सापडला तर २ वर्षांनी आपण लग्न करू.. :)" एवढा वेळ अगदी गप्प बसलेली ती मनापासून हसली... लटक्या रागाने तिने ह्याला चापटी मारली आणि परतीचे तिकिट त्याच्या खिशातून बाहेर काढून वेळ चेक करून घेतली..

-- तो परत निघाला... पण येताना त्याचे मन शांत नव्हते... तिला भेटून आल्यावर असे वाटले की खरंच ही खूप छान मुलगी आहे.. आणि न जाणो पुन्हा एवढी चांगली मुलगी आपल्याला मैत्रीण म्हणून तरी मिळेल की नाही? प्रेमात पडू नकोस असे आपणच बजावत होतो तिला पण आता आपल्या मनात देखील अशी चलबिचल का? केवळ ती दुसऱ्या कोणाची होणार/होऊ शकेल म्हणून? की खरंच असे काहीतरी मर्मबंध आहेत... रेशिमगाठी आहेत की ज्या एकमेकांना भेटून मोकळ्या झाल्या आणि अधिक स्पष्ट दिसू लागल्या...

ती कन्फ्यूज... तो वैचारिक पातळीवरून कधी तळ्यात तर कधी मळ्यात... बरं मनातले तिला सांगावे तर तिला काय वाटेल? न सांगावे तरी पंचाईत... घरी परतल्यावर त्याने त्याच्या सर्वांत जवळच्या मैत्रिणीला साद घातली... काय करू?

-- एकच प्रश्न, 'ती' ने त्याला विचारला... 'त्या'ने त्याच्या मैत्रिणीला विचारला...

तो म्हणाला:- मला कबूल आहे की तिला वाईट वाटू शकेल किंवा मी तिचा संभ्रम अजून वाढवेन पण मला हे सांगायचेच आहे आता... कारण ती कायम मला म्हणायची की ती ऑर्डिनरी आहे आणि मी खूप सुंदर... निदान ह्या एका वाक्याला पुसून टाकायला तरी मला तिला हे सांगायलाच पाहिजे... की तुझ्यात देखील जादू आहे... मी भले सुंदर असेन.. पण तू अंतर्बाह्य सुंदर आहेस आणि तेवढीच निर्मळ देखिल... त्यामुळे न्यूनगंड बाळगू नकोस...   इव्हन यू कॅन बी  डिमांडिंग ... :)

मैत्रीण ::-> खरं सांगू? - दोन पैलू आहेत एक म्हणजे तू तिच्या प्रेमात पडत आहेस, पण तुला कळत नाहीये किंवा अजून वेळ हवा आहे आणि तो तिने तो वेळ द्यायची तयारी दाखवली तर?... ही एक गोष्ट... आणि दुसरी म्हणजे तिने सपशेल नकार दिला... की तिला आता त्या दुसऱ्या मुलामध्ये इंटरेस्ट अश्या लेव्हल वर डेव्हलप झालाय की तुला त्या जागी पाहू शकत नाही ?

==> दोन्ही पैलू बरोबर आहेत, तिच्या भावनांना तिच्याशिवाय कोणीही समजू शकणार नाही... पण हा तिढा तू बोलल्याशिवाय सुटणार देखील नाही... त्यामुळे तू तिला सरळ सांग.. तुझ्या मनात काय चालले आहे.. भले ते काहीही असो.. इतके दिवसांच्या मैत्रीने तिने तुला एवढे नक्की ओळखले असेल.. नाहीच तर निदान आपण बोललो आहोत आणि आता तिचे उत्तर किंवा सामोपचाराने ह्या विषयावर गप्पा मारता येतील... एवढे तरी स्वतःचे मन मोकळे करून घे..

--> समजा ती नाही म्हणाली तर?

==> तर काय? तशीही ती तुझ्यासाठी एक पाहुणी होती... जीने तुझ्या आयुष्यात येऊन तुला प्रेमात पडणे शिकवले... अगदी प्रेमात पडणे नाही तर निदान एकमेकांबद्दल भावनिक ऍटॅचमेंट तरी तुला समजली हेच खूप आहे  अरे मित्रा आता, अस बघ.. ताजमहाल अख्ख्या देशात प्रेमाचं प्रतीक आहे...  आपण तिथे गेलो की भारावून जातो.. त्या वास्तूच्या, कलेच्या, अविश्रांत श्रमाच्या आणि तिथल्या वातावरणाच्या प्रेमात पडतो... पण म्हणून काय कोणी ताजमहाल घरी घेऊन येऊ शकतो का?

त्याच्यासमोर बसून फक्त फोटो काढून आणू शकतो.. एक आठवण म्हणून, आणि आयुष्यभर पुरेल अशी त्याची प्रतिमा डोळ्यात साठवून...   असे समज की शहाजहांन च्या ताजमहालापेक्षाही काहीतरी सुंदर तुझ्या सहवासात होते... जे काही दिवस असो पण त्यामुळे तू तुझे काही तास फक्त स्वतःसाठी आणि आनंदी घालवलेस... १००% प्रेम नाही पण प्रेम ह्या भावनेला स्पर्शून जाणारा एक दुवा तुला अनुभवायला मिळाला...  बस्स.. अजून काय पाहिजे? अरे ह्या आठवणींपुढे तर ताजमहालासमोर काढलेला फोटो देखिल फिका पडेल...

अरे असे कितीतरी लोक मी पाहते आजू बाजूला... विचार न करता येणारे, अती विचार करून संभ्रमात पडलेले... काही नुसतेच आनंद वेचायला आलेले तर काही नुसतेच वाटायला आलेले... व्यक्ती तितक्या प्रकृती... आयुष्यात काही प्रसंग असे असतात की जे आपल्याला मनस्वी आनंद किंवा दुःख देतात.... आपण काय कमावले ह्याची यादी बहुतेक जगजाहीर असते, पण आपण काय गमावले ह्याचे नोटबुक हे स्वतःजवळच असते... आणि ह्या नोटबुक मध्ये आपण "बोलून दाखवण्याचा मोका सुद्धा गमावला" हे यावे यापेक्षा मोठी ट्रॅजेडी दुसरी नाही... तेव्हा,

मुक्त कंठाने तिला सांगून टाक... तू मोकळा हो आणि तिलाही मोकळा विचार करू दे.... ती तुला काही सांगेल/ऐकवेल... शांतपणे ऐकून घे... आणि काही झाले तरी तिला तुझ्या मैत्रीचा तसाच आधार दे... अर्थात तिला हवा असेल तर.. नाहीतर "चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो.. " म्हणत एक शेवटचा पिंग, किवा चॅट वर स्माइली पाठव...    कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही; ते म्हणतात ना  " नथिंग इज कॉन्स्टंट इन धिस वर्ल्ड; बट द चेंज... "  तसेच काही...   लक्षात ठेव,   "लाइफ इज टूऽ शॉर्ट टु कंप्लेन अबाऊट एनिथिंग ... "

आणि हो तुझे जुने गाणे गुणगुणत राहा -- > "हम है राही प्यार के... किंवा... प्यार बांटते चलो... :) "

काय होतंय ते मला कळव मात्र नक्की..

~~ ऑल द बेस्ट ~~