काय करु ?(भाग ३) पुन्हा एकदा...

तो 'विविधभारती' ऐकत ऐकत गादीवर लोळत पडलेला.. अचानक फोन ची रिंग वाजली.. एक मिसकॉल होता, त्याने पाहिला.. नंबर नवीन होता, त्याने देखिल परत मिस कॉल दिला.. तर पुन्हा तेच ! तो कॉल करणार एवढ्यात एक मेसेज आला..  
"गए दिन की तन्हा था मैं अंजुमन में.....यहाँ अब मेरे राज़दाँ और भी हैं !
अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं... सितारों से आगे जहाँ और भी हैं.... "
आईंशपथ...., आत्ता एका सेकंदापुर्वी विविधभारती वर हे ऐकले होते आणि लगेच त्याच ओळी मेसेज म्हणून... ? आता कॉल करून पाहायलाच हवे...
आजवर अनेक अश्या आशयाचे मेसेज झाले, कॉलेजमध्ये तर फुकट म्हणून मित्रांना देखिल चिकार असे प्रबोधनपर विचार पुरवले जायचे... पण आज इतक्या दिवसाने ? आणि हे देखील कधी... माझ्या मोबाईल वर असले काही यायची सवय मोडल्यानंतर ?
--"हॅलो... आपल्या मेसेज बद्दल धन्यवाद.. माझ्या मोबाईलला एकदम १२-१८ महिने मागे जाऊन आल्यासारखं वाटलं असेल..."
!~ 'आणि तुला ? सॉरी तुम्हाला ?'
 हा गोड आवाज कुठेतरी ऐकला आहे, पण नक्की ध्यानात येतं नाही.. १स्ट इयर ला कॉलेजच्या गेट-टुगेदर मध्ये अँकरिंग करणारी सीमा ? नाही ती तर कधीच लग्न करून गेली पॅरिस ला.. मग कंपनीत नव्याने रुजू झालेली निशा ?... पण तिला तर नंबरही दिलेला नाही आणि हे असे काही ती कशाला पाठवेल ?.... मग कोण बरं...  
--"हो, मला पण, माफ करा मी हा नंबर ओळखला नाही..."
!~ 'नवीनंच आहे, म्हटलं जुन्यावर कॉल करत नाही....नवीन घेऊन तरी बघू काही फरक पडतो का ?'
( ह्या वाक्यातल्या मिश्किल विनोदाने तिचे हास्य बाहेर पडले आणि त्यावरून चटकन ओळखले गेले-- "ती" बोलत होती )
--"तू.... ? आज इतक्या दिवसाने" ?
!~ 'का रे ? नको होता करायला फोन?'
--"तसं नाही, पण जेंव्हा वाट पाहत होतो तेंव्ह्या काहीच कळवले नाहीस... साधा एक मेसेज पण.... फक्त 'गुड-बाय' एवढं देखील नाही?"
!~ 'त्याने फरक पडला असता' ? 
-- "नसता" ?
!~ 'असता कदाचित पण, मला तुझी मैत्री जास्त मोलाची होती...
-- "ही अशी ? मी तुझ्या उत्तरानंतर देखील मित्र म्हणून राहिलोच असतो तुझा..."
! ~ 'आज तरी भांडू नकोस ना प्लीज... आज खूपं छान मूड आहे माझा... माझा माझ्या ऐलर्जी वर कंट्रोल आला आहे,,, कॉफी ला भेटतोयस ?'
-- "मी सोडली".
!~'का' ?
--"कारण विचारू नकोस"..
!~ ' कारण द्यावंच लागेल, तुला भेटायचं म्हटलं की पहिले कॉफी शॉप आठवतं... किंवा उलट म्हण हवं तर... जरी मी प्यायले नव्हते तरी तुझ्यासोबत तिथे घालवलेले काही तास... हात हातात घेऊन तुला बोलताना असे वाटले होते की  तुझा विचारांना कॉफीची एक मऊ मुलायम झालर आहे.. कॉफीचा कप असला की तू फक्त तुझा असतोस... गेलं वर्षभर मी ट्रिटमेंट घेतलीये.. म्हणजे आपण भेटलो तेव्हाही चालूच होती पण सांगितलं नव्हतं... आणि आज मी कॉफी ला चल म्हणतिये तर तुझे काय हे असे ?
--"जाऊदे दे स्वीटी.. आपण दुसरं काहीतरी बोलूया ना.."
!~ 'अरे पण...' 
--"लग्नाची पत्रिका द्यायला भेटणार आहेस का ?"
!~'तुला मी फक्त तेव्हाच भेटायला हवी आहे का' ? 
काही प्रश्न घातकच... त्यातही ते ज्या वेळेवर विचारले जातात त्यावर त्याचा रामबाण ठरतो.. ! वपुंचे वाक्य आठवले - "आयुष्यात एक क्षण भाळण्याचा बाकी सगळे सांभाळण्याचे.. " ह्या क्षणाला पुरता न्याय देऊनही सांभाळायचे क्षण बहुदा रितेच राहिले असे वाटले... त्याच रितेपणावर मात करायला पुन्हा एकदा भेट व्हावी आणि नक्की तिला काय म्हणायचे आहे हे तरी जाणून घ्यावे ?
तिचे लग्न ठरले असेल ? की झालेही असेल ? नवऱ्याला बरोबर घेऊन तर येणार नाही ना ? लग्न झालेच नसेल? एक ना अनेक विचार... मी नाही म्हणू शकलो नाही !
येतो म्हणून 'ती' ला ठिकाण आणि वेळ विचारून घेतली... घरातून निघताना डोक्यातली यंत्र अनाहुतपणे मागे फिरत होती -- काय करू ? ह्या एका प्रश्नामुळे ...जो सुखाचा काळ पाहायला मिळाला तोच ह्या प्रश्नाने हिरावून देखील नेला होता... अनेक दिवस ह्याच विचारांनी मनात वादळे उठवली होती, आणि काळ - मीच सर्वात मोठा डॉक्टर आहे हे पटवून देऊन अगदी इतरांना समजवण्याएवढा अनुभव गाठीशी बांधून गेला होता... उरला होता फक्त किशोर च्या गाण्यावर नाचणारा देव आनंद, नौ-दो-ग्यारह पाहून घेतलेली आणि शो केस ला लटकवलेली मोठी हॅट... आणि ताजमहालाचा फोटो. ~!
आज इतक्या दिवसांनी भेटतोय...नुसतेच विचारांच्या वादळावर स्वार होऊन चालणार थोडेच... सामाजिक शिष्टाचार म्हणून काही ना काही हाती न्यावंच लागेल... पण परिस्थिती कळल्याशिवाय काय न्यावे हे देखिल एक कोडेच..  
पिवळा गुलाब सर्वांत उत्तम अगदी कॉलेज काळापासून ते आजपर्यंत... ही ट्रिक सर्वांत सोयीस्कर आणि श्रेयस्कर.... नक्की ठरले !
गाडीत पेट्रोल चेक केले, आणि अक्सेलेटर पिळला.... आज अनेक दिवसानंतर भेट होणार होती, अगदी तिच हुरहुर.. . तेच आकर्षण... नसले तरीही,
एका अनाकलनीय ओढीने तिथे पोहोचण्याचे वेध लागले होते... ...... ...बहुदा काही उत्तरांसाठी.. किंवा नव्याने प्रश्न पाडून घेण्यासाठी ?.... ... 
......
. ... ..