मॅट्रिक्स रसग्रहण २

बऱ्याचशा विज्ञान कथांमध्ये दिसणारे हे कथानक पूर्णं वळण घेते ते ह्या टप्प्यावर..‌ सर्व उपाय कुचकामी ठरल्यावर ऊर्जेची गरज भागवण्यासाठी यंत्रांनी काढलेली टूम म्हणजे ह्या चित्रपटाचा गाभा....


अस काय बरं केलं यंत्रांनी?.....


-----------------------------------------------------------------


ऊर्जेचा स्रोत अखंड राहण्यासाठी यंत्रांनी चक्क सुरू केली, पूर्ण पाडाव झालेल्या माणूस नावाच्या प्राण्याची शेती!!.. प्रत्येक मानवी शरीरांचा वापर ऊर्जानिर्मितीची यंत्रे म्हणून यंत्रांनीच करायला सुरुवात केली. कृत्रिमरीत्या मानवी जीवांची पैदास करून त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर यंत्रांचा कारभार चालू लागला. पृथ्वीच्या पाठीवर ही अशी अगणित शेते उभी राहिली... माणसाला जन्म देणे बंद झाले राहिली ती फक्त पैदास!...ह्या सर्व शेतांमध्ये असंख्या मानवी जीव झोपेत ठेवून त्यांची ऊर्जा शोषून घेण्याची यंत्रणा उभी राहिली. ह्या सगळ्या यंत्रणे मध्ये एक त्रुटी होती.. ती म्हणजे इतक्या साऱ्या जीवांना कायम झोपेत ठेवणे...


..त्यावर उपाय म्हणून निर्मिती झाली मॅट्रिक्स नावाच्या अद्भुत प्रणालीची. कल्पना करा की आपल्याला एक स्वप्न पडले आहे.. ते इतके खरे आहे की आपण स्वप्न आणि वास्तव ह्यातले भानच विसरून गेलोय.. साहजिकच त्या स्वप्नातून बाहेर आल्यावर आपली मनस्थिती , 'अरेच्या! आता जे अनुभवले ते स्वप्न होते होय?' अशी होते... मॅट्रिक्स हे असेच समस्त मानवजातीला 'पाडले'ले एक स्वप्न आहे... सत्य स्थितीपासून डोळ्यावर झापडे ओढून कायमचे गाढ झोपी ठेवण्यास कारणीभूत ठरणारे स्वप्न म्हणजेच मॅट्रिक्स... ह्या स्वप्नात एक हुबेहूब जग तयार केले आहे...ज्यामध्ये सगळे आपापले जीवन जगतात, कामे करतात आयुष्यात पुढे जातात पण सत्यात मात्र प्रत्येक जण खितपत पडला आहे ह्या शेतांमध्ये. लोकांच्या मनांनी हे स्वप्न इतके खोलवर स्वीकारले आहे की त्यांना ह्या झोपेतून जाग येणे शक्य नाही. थोडक्यात मॅट्रिक्स ही एक अशी आज्ञावली आहे की ज्यातून लोकांना सत्याचा भास इतका बेमालूमपणे केला आहे की आभास आणि वास्तव ह्यातला फरक मानवी इंद्रियांच्या पलीकडे आहे.


सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे.. तुम्हाला आवडलेला एखादा भावुक चित्रपट आठवा.. चित्रपटातील सर्व प्रसंग हे कृत्रिम/खोटे/काल्पनिक आहे हे माहीत असून देखिल काही वेळेला आपल्याला हुंदका अनावर होतो, कारण आपण त्या चित्रपटात इतके समरस झालो असतो की आपल्या सब-कॉन्शस लेव्हल वरती मनाने हे सत्य म्हणून स्वीकारलेले असते. आता हा झाला साध्या एका चित्रपटाचा परिणाम...एका द्विमितीय माध्यमातून! समजा ह्याच्या पुढे एक पायरी जाऊन तुम्हाला एका संगणक निर्मित त्रिमितीय जगात नेले ज्याला 'व्हर्च्युअल रिऍलीटी' असे संबोधले जाते..तर तुमच्यावर होणारा परिणाम कितीतरी अधिक असेल... थोडक्यात वास्तव म्हणजे जर निव्वळ तुमच्या मेंदूने ग्रहण केलेल्या काही विद्युत लहरी असतील.. तर अशा कृत्रिम लहरी मेंदूला पाठवून वास्तवाचा बेमालूम आभास करणे शक्य आहे.  


'मॅट्रिक्स' हा असाच एक व्हर्च्युअल रिऍलीटी प्रोग्रॅम आहे. जो प्रत्येकाच्या मेंदूने स्वीकारला आहे. प्रत्येक जण आपापल्या दुनियेत मग्न असला तरी नियंत्रण हे शेवटी त्याच्या निर्मात्याकडे आहे.  


क्रमशः