मॅट्रिक्स रसग्रहण ४

...मॅट्रिक्समध्येच असा एक जीव जन्मास येणार आहे की त्याची सुटका करण्यास माणसाला यश आले तर तो समस्त मानवजातीला यंत्रांच्या जोखडातून मुक्त करू शकणार आहे.. बस्स मॉर्फियसच्या जीवनात आता एकच ध्येय आहे..'त्या'चा शोध घेऊन त्याला मुक्त करणे. 


-------------------------------------------------------------


चित्रपटाची सुरूवात होते तीच मुळी ह्या प्रसंगापासून. मॉर्फियसचा हा शोध अखेर संपला आहे. त्या एकमेवाद्वितीयाची पक्की माहिती मॉर्फियसच्या कंपूला मिळाली आहे. ट्रिनीटी, टँक, डोझर,स्विच, सायफर अशी चित्र विचित्र नावे असणारा आणि वेगवेगळ्या कौशल्यांवर प्रभुत्व असणारा मॉर्फियसचा कंपू आता 'त्या'ला मुक्त करण्याच्या मोहिमेवर लागला आहे. ह्या कंपूतले काही मॉर्फियस सारखेच मॅट्रिक्स मध्ये जन्मून नंतर मुक्त झालेले जीव आहेत तर काही झायॉन मध्येच जन्माला आलेले आणि त्यामूळेच अतिशय अभिमानाने '१००% नैसर्गिक माणूस' असा उल्लेख करणारेही आहेत... सगळ्यांना आता एकच उत्सुकता लागून राहिली आहे.. लवकरात लवकर 'त्या'ची भेट घेण्याची...


कोण आहे हा 'तो'?.... हा तो म्हणजेच चित्रपटाचा कथानायक 'निओ'. कसल्या तरी विचाराने सतत झपाटलेला.. तास न तास संगणकावर बसून राहणारा.. झोपेचे कसलेही वेळापत्रक नसणारा.. प्रसंगी जागे आहोत की स्वप्न रंजन करत आहोत ह्याचे भानही नसणारा.. आणि कधी ना कधी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ह्या आशेवर असणारा निओ...


इकडे यंत्र जगतालाही माणसांच्या ह्या करामतींचा सुगावा लागलेला आहे. मॅट्रिक्स मध्ये होणाऱ्या हॅकिंगवर उपाय म्हणून काही खास आज्ञावल्या लिहिल्या जात आहेत. सामान्य लोकांच्या नजरेत एखाद्या 'गुप्तचर संघटनेचे अधिकारी' म्हणून वावरणाऱ्या व्यक्ती ह्या प्रत्यक्षात एखाद्या 'अँटी-व्ह्यायरस' प्रणाली प्रमाणे मॅट्रिक्स सतत पिंजून काढणाऱ्या आज्ञावल्या आहेत.. मॉर्फियसच्या कंपूला मॅट्रिक्स मध्ये घुसण्यापूर्वी आता ह्या अधिकाऱ्यांना चकवण्याचीही तयारी करावी लागत आहे. 


जरी ह्या गुप्तचर अधिकाऱ्यांना मॉर्फियसच्या कंपूतील एकालाही पकडण्यात यश आले नसले, तरी मॉर्फियसचे पुढचे लक्ष्य 'निओची सुटका' आहे हे लक्षात आले आहे. एका बाजूला मॉर्फियस आणि त्याचा कंपू तर दुसऱ्या बाजूला हे गुप्तचर अधिकारी दोघेही निओचा शोध घेण्यासाठी मॅट्रिक्स पिंजून काढत आहेत तर स्वतः निओ मात्र ह्या सगळ्यापासून पूर्णं अनभिज्ञ आहे... अखेर मॉर्फियसने निओशी संपर्क साधतो पण त्याच वेळेस अधिकाऱ्यांनाही निओचा सुगावा लागल्याने, तेही निओच्या कार्यालयावर धाड घालून त्याच्या शरीरात एक उपकरण सोडून त्याचा माग ठेवायची सोय करतात.


मॉर्फियसचा कंपू विरुद्ध ह्या अधिकाऱ्यांची ताकद अश्या मुकाबल्या मध्ये अखेर मॅट्रिक्सला गुंगारा देऊन निओला काबीज करण्यात मॉर्फियसला यश मिळते... निओला मानवी शेतातून पळवून आणले जाते.... हे नक्की काय घडत आहे? आपल्या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार? हे प्रश्न मात्र निओसाठी अजूनही अनुत्तरितच आहेत.. त्याच्या कानात फक्त मॉर्फियसचा खर्जातला आवाज साठून राहिला आहे..


"शांत राहा सर्व उत्तरे एक एक करून येता आहेत! "


 - क्रमशः