मॅट्रिक्स रसग्रहण ३

'मॅट्रिक्स' हा असाच एक व्हर्च्युअल रिऍलीटी प्रोग्रॅम आहे. जो प्रत्येकाच्या मेंदूने स्वीकारला आहे. प्रत्येक जण आपापल्या दुनियेत मग्न असला तरी नियंत्रण हे शेवटी त्याच्या निर्मात्याकडे आहे.  


-----------------------------------------------------------------


इतकी क्लिष्ट प्रणाली बनवणे यंत्रांना सहज शक्य झाले का?.. बिलकूल नाही! ही प्रणाली बनवण्यासाठी यंत्रांना खूप मेहनत घ्यावी लागली..  मॅट्रिक्सची सुरुवातीच्या आवृत्त्या माणसांच्या मेंदूंकडून नाकारल्या जायच्या... आणि त्यांना गाढ झोपेत ठेवणे अशक्य व्हायचे... सुरुवातीच्या आवृत्त्यांमध्ये मॅट्रिक्सच्या रचनाकारांनी एक अतिशय आदर्श जग बनवले... सगळेच अतिशय आनंदी राहतील आणि त्यामुळे त्यांची मने ह्याचा सहजगत्या स्वीकार करतील असा सोपा युक्तिवाद त्यामागे होता. पण प्रत्यक्षात मात्र हे आदर्श जग सपशेल अपयशी ठरले. ह्याचे कारण शोधण्यासाठी यंत्रांना, अतिशय जटिल अश्या मानवी मानसशास्त्राचा त्यांना अभ्यास करावा लागला. नक्की कशा प्रकारचे हे मायावी जग बनवले म्हणजे लोक त्याचा लगेच स्वीकार करतील? ह्यावर रचनाकारांनी बरेच संशोधन केले, आणि त्यातूनच निर्मिती सुरू झाली मॅट्रिक्सच्या सध्याच्या आवृत्तीची. 


मॅट्रिक्सच्या रचनाकारांच्या लक्षात आले की कितीही आदर्श आणि सुंदर जग बनवले तरी दुःख,दैन्य दारिद्र्य, पीडा ह्यांचा समावेश केल्याखेरीज मानवी जीवन अपूर्ण आहे,आणि त्यातूनच अवतरली मॅट्रिक्सची सध्याची आवृत्ती. साधारण सन २००० च्या सुमारास जग जसे होते तसे हुबेहूब जग बनवण्यात आले...तंत्रज्ञान,प्रगती, वैभव ह्यांच्या सोबत दैन्य दारिद्र्य ह्यांचाही समावेश करण्यात आला. हजारो आज्ञावल्या नव्या लिहिल्या गेल्या .. अनेक बदलण्यात आल्या...आणि शेवटी सध्याची आवृत्ती प्रकाशीत करण्यात आली... आणि काय आश्चर्य.. माणसांच्या मेंदूंनी ह्या नव्या प्रणालीचा अगदी अलगद स्वीकार केला. लाखो जीव गाढ झोपेत ठेवण्यास यात्रांना अखेरीस यश मिळाले.. यंत्रांना भेडसावणारा ऊर्जेचा प्रश्न एकदाचा सुटला.


यंत्र आणि माणूस ह्यांच्यामध्ये झालेल्या भीषण युद्धामध्ये जी काही माणसे जगली वाचली होती त्यांनी एकत्र येऊन पळ काढला आणि सरळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्खनन करून खोल पाताळात एक नवे शहर वसवले आणि तिथे ते दडून राहिले. ह्या शहराला नाव दिले गेले 'झायॉन' - मानवी अस्तित्वाचे शेवटचे शहर. इथे खोल पाताळात दडून माणसाला यंत्रांची कामगिरी पाहत राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. यंत्राशी आमने सामने मुकाबला करणे अशक्याच्याही पलीकडे होते... एकमेव आशेचा अंधुक किरण होता जो म्हणजे 'गनिमी कावा'.. यंत्रांनी बनवलेल्या मॅट्रिक्स मध्ये हॅकींग करून घुसणे आणि झोपलेल्या जिवांना उठवून त्यांना हे 'स्वप्न' आहे ह्याची जाणीव करून देणे.  अशी जाणीव झालेले जीव, मानवी शेतांमध्ये चोरून घुसून झायॉनमध्ये आणायला सुरुवात झाली.  मॅट्रिक्सच्या मधल्या विशिष्ट लोकांची निवड करून त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणे सुरू झाले. असाच एक सुटका झालेला माणूस म्हणजे 'मॉर्फियस'. मॅट्रिक्स मध्ये असताना हॅकर म्हणून जगणारा मॉर्फियस आता मुक्त होऊन त्याच कौशल्याचा वापर करत आहे मॅट्रिक्स मध्ये हॅकिंग करण्यासाठी.


मॉर्फियस झपाटला आहे एकाच ध्येयाने. ..'ऑरकल' नावाच्या एका विदुषीच्या भविष्यवाणीवर त्याचा गाढ विश्वास आहे.. ऑरकलच्या भविष्यावाणी नुसार मॅट्रिक्समध्येच असा एक जीव जन्मास येणार आहे की त्याची सुटका करण्यास माणसाला यश आले तर तो समस्त मानवजातीला यंत्रांच्या जोखडातून मुक्त करू शकणार आहे.. बस्स मॉर्फियच्या जीवनात आता एकच ध्येय आहे..'त्या'चा शोध घेऊन त्याला मुक्त करणे.     


 क्रमशः