संजय उवाच

मग संजयो म्हणे रायातें । आइकें ते कोर्ट तेथें ।
शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥ १॥

तें कोर्ट देखोनि समस्त । भिती उपनली अद्भुत ।
तेणें थरारले चित्त । भुकंपापरी ॥ २ ॥

जरी कोर्ट सारखे विचारे । ना तरी त्याची वाचा हाले ।
बधीर होवोनी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३॥

जरी चाहत्यांत दहाडला। कोर्टात अति कोमाइला ।
जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥

तयापरी सूनिलकुमरु । महामोहें अतिजर्जरु ।
देखोनि न्यायमेरू । काय बोले ॥ ५ ॥

संजय उवाच

"मी मुंबईस अर्चिजती । गृहे खासदारकी पावविजती ।
तियें पाठीं केवीं वधिजती । आपुला बॉम्ब ॥ ६ ॥

बंदुका जेव्हा आल्या घरू। आम्ही स्वप्नींही न शको धरूं ।
यामुळेच होईल कधी। घातु सारा॥ ७॥

मी संजू, चहात्यांचा झाला । येणें अभिनेतृ मज दिधला ।
तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें ॥ ८॥

केला मी गुन्हा त्या अवसरीं । म्हणे संजय बंदुकधारी।
चेहऱ्यावर अतीव लाचारी । मागे माफी ॥ ९ ॥

हें बोलोनी संजू बिहाला । मग पुनरपि बोलों लागला ।
म्हणे न्यायधीशा कां हो मला । सुटका देतीच ना ॥ १० ॥"

कोदे उवाच

त्या घटनेचे बळ देखोनि । जो शोकु उपजलासे जनीं ।
तो तुझिया वाक्यावांतुनी । न जाय आणिकें ॥ ११ ॥

ना कित्येकांचे आयुष्य उरलें आहे । जखमांना औषधें काही नोहे ।
एथ एकचि उपेगा जाये । तुझी कैद ॥ १२॥

तुजसवे होती राज्यभोगसमृद्धि । लाभली तुवा जीवन-बुद्धि ।
ठेवता बंदुक नव्हती का शुद्धी । कारुण्य तुझें ॥ १३॥

तेथ न्यायाधीशांची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती ।
गंभीरतेने आले निर्णयाप्रती । गर्जनेची ॥ १४॥

नेहेमी कृत्य करते वेळी । करावा विचार सकळी ।
आता भोग या वेळी । शिक्षा अर्धतप ॥१५॥

तयापरी बंदुकधरू । जाहलासे दुःखे जर्जरु ।
जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ १६॥

इये जनताही सुखावली । नि:पक्ष न्याय परी ।
झाला न्यायमंदिरी । कधीतरी ॥१७॥

कोणी झोकेल अधर्मात । भारतास खेचेल ग्लानीत ।
करावया त्यांचा नि:पात । धावेल कायदा ॥१८॥

तैसे वरिवरि पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें ।
तियें काव्य 'ऋषिकेशे' । चुकल्यास क्षमस्व ॥ १९ ॥

ऋषिकेश दाभोळकर
१६-०८-२००७

टिप: या विडंबनाद्वारे, पवित्र आणि सुरचित ज्ञानेश्वरीचा अपमान करण्याचा कोणताही हेतु नाही. भावना दुखावल्या गेल्यास क्षमस्व!