हा खेळ माकडांचा

चाल :

हा खेळ सावल्यांचा

दिल्लीत खेळ चाले, या मूढ माकडांचा
संपेल ना कधीही, हा खेळ माकडांचा ||

हे कमळ ना सुगंधी, संघात घडवलेले
जातीयवाद नामे, काट्यात अडकलेले
तोंडात राम असुनी, आचार रावणाचा
संपेल ना कधीही, हा खेळ माकडांचा |

लढण्यात पाकळ्या जर, आपापसात दंग
कैसा मुठीत यावा, सत्तेसमान भृंग
करते धनुष्य मारा, कमळावरी शरांचा
संपेल ना कधीही, हा खेळ माकडांचा |

पिझ्यास इटलिमधल्या, लालू, पवार बेस
डाव्यांकडून वरती, जुनकट नि लाल सॉस
मनमोहनास होई, मग त्रास अपचनाचा
संपेल ना कधीही, हा खेळ माकडांचा |

कुरवाळण्यात 'दाढी', पंजा सदैव मग्न
अफजल गुरुस फ़ाशी, देण्या अनेक विघ्न
राष्ट्रास का पती हा निर्जीव लाकडांचा
संपेल ना कधीही, हा खेळ माकडांचा |