मी काठावर तू दूर सागरावरती
वाळूवर उमटे तळमळणारी भरती
एकेक लाट मज येते सांगत काही
"या वाळूवरले घर टिकणारे नाही"!
हा खारा वारा, शंख शिंपले रेती
हातात माझिया कोलाजासम नाती
ओहटी अशी रांगोळ्या घालत जाते
लोण्यासम ही पुळणच पायी रुतते
कधी समुद्रपक्षी निरोप घेउन येती
आशाचक्राची गती वाढवत जाती
मज साद घालती विजा वादळे होड्या
पण पायी माझ्या मणामणांच्या बेड्या
वाटते भरावा शिडात फिरुनी वारा
मी पळून जावे तोडुन इथली कारा
रे तुटले माझे पंख सांधतिल केंव्हा?
ये धावत सत्त्वर उपाय होउन रावा...
-संपदा
(०९/०८/२००७)