बाहेरी जग शांत शांत निजले, मी जागतो एकला
भीती दाटतसे, सकंप भरले, अंगी जरा हीवही
वाटे आज मला क्षणात अवघ्या, हा जायचा जीवही
ठोकाही मम काळजात अडके, हा श्वासही थांबला
हाका कोण इथे मला नवनव्या, कोनातुनी मारते?
का ही हासतसे मला खदखदा , काचेतली बाहुली
भिंतीच्या पडद्यावरून पळते माझ्याकडे सावली
पायाला मम घासुनी पळतसे काहीतरी गार ते
अंधारातच शोधतो बटण मी , लागे न का हा दिवा
कोणी आणि पुन्हा कसा विझवला, कंदीलही नेमका
मारी कोण मला इथे दगड का? त्याचा चुके नेम का?
धावावेच अता इथून धरुनी, हातामधे या जिवा
मौजेने मग घालतेच दणका पाठीवरी माझिया
पैजेचा पण जिंकिता परत दे, तो फ्यूज माझी प्रिया!
--अदिती
(२७ ऑगस्ट २००७,
श्रावण शु. १४ शके १९२९)
(वि. सू. -: महेशरावांची क्षमा मागून आणि त्यांच्याचकडून स्फूर्ती घेऊन केलेला हा एक प्रयत्न आहे असे नम्रपणे सांगू इच्छिते. सुनीतात बऱ्याच चुका असणे सहज शक्य आहे. पहिल्यांदाच हा प्रयत्न केला आहे. काय चुकलेमाकले असेल ते जरूर सांगावे ही विनंती.
--अदिती)