इतिहास-जमा

नमस्कार मंडळी,

इतिहास हा विषय शाळेतला मोठा शत्रु. शालेय जीवनात तह केले असतील तर ते याच विषयाशी. अहो कुठल्या साली काय घडले हे लक्षात ठेउन उत्तर द्यायचे म्हणजे फ़ारच झाले. असो. इतिहास हा विषय गहन असला तरी इतिहास-जमा हा शब्द आपण बऱ्याच वेळा वाचनात आलेला पाहिला असेल. सध्याचे राहणीमान इतके गतीमान झाले आहे की पुर्वी पिढ्यां-पिढ्यानंतर इतिहास जमा होणाऱ्या काही गोष्टी आपल्या नजरे समोर काळाच्या पडद्या मागे जाउ लागल्या आहेत. अश्याच गोष्टी वाचकांकडुन समजुन घेणे हाच ह्या लेखाचा उद्देश.

दुचाकी मधे  लुना, टीव्ही एस ५० ,एम ५० , राजदुत मोटरसायकल आणि येझदी  या  हळुहळु दिसेनाश्या झाल्या. पुण्यात लाल-निळा रंगाच्या कागदात मॉडर्न ब्रेड मिळत असे. चतुश्रुंगी च्या जत्रेत आणि गणपती उत्सवात पत्र्याची टिकटिकी मिळत असे (त्यावर बहुधा नंतर बंदी आली) आताह्या गोष्टी पहायला मिळत नाहीत.

साधच उदाहरण सांगतो, सध्याच्या मुलाना मी लहानपणी सायकलचा टायर काठीने पळवत शर्यत लावत असु असे सांगीतले की त्यांना आश्चर्य वाटते. सायकलच्या टयुबची रबर कापुन ओल्या कागदावर गुंडाळुन तयार केलेला रबरी चेंडू कसा वळतो ते प्रत्यक्ष खेळल्यावरच कळेल ना !!!

साधे बॉलपेन सुद्धा रिफ़ील बदलायची वेळ येइस्तर मुलांकडे नसते. गेल्या वर्षीच्या वह्यांची उरलेली पाने बाईंड केलेली वही , अश्या किती तरी गोष्टी आहेत ज्या आता फ़ारश्या लक्षातच येत नाहीत. 

काही गोष्टी मात्र काळाच्या कसोटीवर भक्कम टिकुन रहातात. उदा: अमृतांजन किती पिढ्या चालु आहे कोणास ठाउक  

आपल्या आठवणीत अश्याच काही इतिहास जमा झालेल्या किंवा टिकुन राहीलेल्या गोष्टी जरुर व्यक्त कराव्यात ही नम्र विनंती-

विनम्र - शशांक