एक दोन दिवसापूर्वीची संध्याकाळ.मी घरी एकटाच होतो.समोर कागद व लेखणी घेऊन बसलो.काही तरी सुचत होतं पण नीट आकारत नव्हतं.खिडकीतून बाहेरचं दिसणाऱं आकाश निळसर होतं. मी भरकटल्यासारखा लिहत गेलो.
निळं आभाळ आहे निळं घरटं
निळ्या चिमणीचं...
तेवढ्यात दारावरची घंटा जोरात वाजली. काहीश्या नाराजगीनच मी दार उघडलं. समोर सोसायटीच्या आवारात खेळणारी बच्चेकंपनी उभी होती. सहा-सात वर्षाच्या तीन चिंग्या पोरी व त्या पोरीपैकीच एकीचा भाऊ असणारा एक पाच सहा वर्षाचा चिंट्या!. मंडळी घामेजलेली,खेळून थकलेली होती.
त्यातली एक चिंगी पुढे होत म्हणाली "काका! आम्हाला तहान लागलीय,पाणी द्या नं थोडं..."
मी त्यांना आत नेलं, फ्रीज उघडून गार पाण्याच्या बाटल्या काढून दिल्या. मला प्याले काढायचा वेळही न देता पोऱींनी सरळ बाटल्याच तोंडाला लावल्या आणि मग़ चूक झाल्यासारख्या ओशाळून जीभा बाहेर काढल्या. मी त्यांना 'काही हरकत नाही.. चालू द्या' अशी खूण केली. पाणी पिऊन पोरी निघाल्या. तेव्हढ्यात जरा मागे रेंगाळत,छोट्या चिंग्यानं समोरच्या कागदावरली ओंळ वाचत मला विचारलं:
"काय लिहताय?"
"-- कविता." मी उत्तरलो.
त्या पोरानं कादावरचा 'निळ्या चिमणी' हा शब्द वाचला मात्र तो जोरात ओरडला.
"काका, 'निळी चिमणी', सॉलीड! आमच्या घराच्या खिडकीत एकदा आली होती! मस्त निळी निळी,पंख निळे,पीसं निळी..मी ताईला बोलवायला धावलो.पण तेवढ्यात उडून गेली! नंतर मी या सगळ्या पोरींना सांगितलं तर ह्या कोणीच विश्वास ठेवायला तयार नव्हत्या.मला म्हणाल्या' ए काही बंडल मारू नकोस. 'निळी चिमणी असते कां कधी?' मला 'येडचाप' पण म्हणाल्या.."
काका,तुम्ही पाहिलीय नं 'निळी चिमणी'?" मी हसून मान डोलावली.
मग तो माझा हात धरून मला ओढत नेत म्हणाला "मग या पोरींना सांगा ना,काका! तुम्ही मोठे आहात. तुम्ही सांगीतलं तर त्यांचा विश्वास बसेल. आत्ता चला! सांगा त्यांना निळी चिमणी असते!.."
आणि मीही त्या पोरामागून गेलो. असं खऱ्या कवितेनं हाताला धरून नेण्याची ती पहिलीच वेळ असावी....
जयन्ता५२