स्वच्छ

घर कसं स्वच्छ हवं
घासून पुसून लख्ख हवं-----
कपटे कचरा रद्दी भंगार--
नको त्या सामानाचा हडेलहप्पी कारभार
दुसरं तयार व्हायच्या आत 
आधीचं उपसायला हवं-----!
थांबू नकोस, बांध कंबर, 
कर सुरू, उचल झाडू--
---झटकून टाक दिसतात तेवढी
जळमटं झटाझटा;
मोकळे कर कप्पे सगळे
गच्च तुंबून भरलेले
----आवडत जरी नसलं तरी
घर रितं व्हायलाच हवं--------!
एक मात्र लक्षात ठेव----
उलथापालथ करताना,
सगळं सगळं जुनं जीर्ण
भसाभसा काढताना
नाजुकसं काहीतरी
---हळुचकन समोर येईल
आठवणींची नक्षीकाच
सरसरून पुढे जाईल
----तडा नको जाऊ देऊस
घिसडघाई करताना--
घरातही -----मनातही
त्याचं स्थान घट्ट हवं-------!
मग बघ घर कसं
पाण्यासारखं नितळ दिसेल
तुझा चेहरा तुलाच मग
स्वच्छ आणि 'सरळ' वाटेल
गोजिरवाणं घर म्हणेल
दुसऱ्या एका घराला,
"चल काढ तुझासुद्धा
पसारा आवरायला
विचारांची फोलपटं, सूडाची जळमटं
उंबऱ्याच्या आतमध्ये सवे घेऊन येणाऱ्या
विकारांनी बरबटलेल्या
सहा पायांच्या खेकड्याला
संयमाच्या कुंच्याने
बाहेरच लोटायला हवं------
---घर कसं स्वच्छ हवं
------मन कसं स्वच्छ हवं
घासून पुसून लख्ख हवं"