ही कविता आयुष्यभर सेवाभावनेने, निष्ठेने, तळमळीने शिकविणार्या बा. रा. दीक्षित सरांच्या पावनस्म्रुतीस समर्पित
जागवित हृदयी कितींच्या ज्ञानपूर्णा जान्हवी
ते क्रुष्णमय होऊनी गेले देह फेडुनी मानवी ll ध्रू ll
ते कर्मयोगी सारथी, व्रत शिक्षकाचे घेऊनि
विस्तारले शिष्यांतुनी रथ मार्गी त्यांचे लावुनी
सूर्यास त्या उपमा कुठे? तो जीवनाला तेजवी
ते क्रुष्णमय होऊनी गेले देह फेडुनी मानवी ll १ ll
पाऊली त्यांच्या अहिल्या जन्मल्या दगडांतुनी
त्या ज्ञानघन वर्षेमुळे काठिण्य गेले भंगुनी
त्या तापसाचे तप असे इंद्रादीकांना लाजवी
ते क्रुष्णमय होऊनी गेले देह फेडुनी मानवी ll २ ll
मिळतील का ऐकावया पुन्हा ती अवखळ उत्तरे ?
निर्मळ खळाळून हासणे, आठव हृदय व्यापून उरे
गंगौघ आमुचा आटला, तुटली सुखाची पालवी
ते क्रुष्णमय होऊनी गेले देह फेडुनी मानवी ll ३ ll
मज सांग क्रुष्णा एकदा त्यांना परत देशील का ?
मनी राहिली अजुनी बीजे कित्येक ती स्रुजनाविना
मन आर्ततेने दाटले तू झाकता आमुचा रवी
ते क्रुष्णमय होऊनी गेले देह फेडुनी मानवी ll ४ ll
तुज राहिले काही उणे कर घातला आमुच्या धना ?
तू काय जाणे मानवाच्या विरहकाळी यातना ?
मज दे क्षमा, मन शिणवुनी हा विरह कडवट बोलवी
ते क्रुष्णमय होऊनी गेले देह फेडुनी मानवी ll ५ ll