महिमंडणगड

महिमंडणगड

सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात भटकायचे तर ते सप्टेंबर ते जानेवारी या काळात भटकायला हवे. आणि पावसाची मजा लुटायला एखाद दुसरा ट्रेक भर पावसाळ्यात करायचा. पण याही वर्षी आम्हाला जाग आली ती सगळा मौसम संपून गेल्यावर. त्यामुळे आता किल्ला निवडताना रात्री चढून जाता येईल असा किंवा मग जरा तरी सावली असेल असा शोधावा लागतो.

तर असाच कोयनेच्या जंगलातला म्हणून महिमंडणगड निवडला. याचे स्थानही जाण्या येण्याच्या दृष्टीने थोडे अडनिडेच आहे. महाबळेश्वरच्या पायथ्याचे तापोळे अनेकांना माहीत असेल, तिथून कोयनानगरपर्यंत पन्नास साठ किमी उत्तर दक्षिण असा शिवसागर जलाशय पसरला आहे. हा जलाशय आणि पश्चिमेची सह्याद्रीची भिंत यामधल्या भूभाग हा सातारा जिल्ह्यापासून तुटलेला आहे. दाट जंगलाने व्यापलेल्या या भागात आठ दहा छोटी गावे तग धरून आहेत, पण तिथे जायचे म्हणजे रस्ता नाही, तापोळा किंवा बामणोलीमधून बोटीने जावे लागते. रस्ते नसल्याचा फायदा म्हणजे जंगल आणि अगदी अस्वलापासून ते वाघापर्यंत प्राणीसृष्टी टिकून राहिली आहे.

या भागात यायला कोंकणातून वर चढून यायला एक रस्ता करण्याचाही प्रयत्न झाला आहे. हाच तो रघुवीर घाट ज्याने मेट शिंदी या गावी रात्री मुक्कामाला पोहोचायचे ठरवून आम्ही शनिवारी २९ एप्रिलला पुण्याहून दोन सुमो आणि पंधरा जण घेऊन निघालो. या घाटाने प्रवास केलेला कुणीही मनुष्य ऐकिवात नव्हता, पण जाता येते असे एकाने सांगितले आहे असे दुसऱ्या एकाने सांगितले आहे असे धूमकेतूने सांगितले होते, तेच मी पुढे सांगितले. विकीमॅपिआवर डोळे ताणून असा घाटरस्ता आहे अशी खात्रीपण करून घेतली होती. आधी निघायला आणि मग वाटेत बराच उशीर होत, मुंबईकरांना बराच वेळ ताटकळत ठेवत मुळशी, ताम्हिणीवरून मुंबई गोवा महामार्गाला माणगाव, महाड जवळ पोहोचलो. जेवून पुढे निघालो, सर्व जण पेंगुळले होते, पण अचानक गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊ लागली, गाडीतले लोक ओरडायला लागले, आता पलीकडे खाली नदीच्या कडेला कोसळणार असे दिसू लागताच अखेर आम्ही स्टीअरिंगला हात घातला आणि मग ड्रायव्हरसाहेबही खडबडून जागे झाले. परिणामतः नंतरच्या प्रवासात सर्व जण टक्क जागे होते. महाड, पोलादपूर वरून खेडला पोहोचलो, तिथे खेडचे जावई असलेले धुमकेतू आणि त्याच्याकडे थांबलेले मुंबईकर असा एकूण वीस प्रवासी आणि तीन चालक असा काफिला खोपीमार्गे रघुवीर घाट चढू लागलो. काटे पूर्ण फुलवलेले एक साळिंदर आणि आमच्या समोरच पळणारे ससे असे वन्यजीवदर्शनही घडले. घाट फारसा वापरात नव्हता हे लक्षात येत होतेच, पण सुमो, क्वालिसने जाण्यासारखा आहे. खेड -खोपी वीस किमी आणि पुढे घाटरस्ता आहे पंधरा किमी. घाटमाथ्यावर आलो की जंगलाच्या एका पट्ट्यात रस्ता नाही पण तसेच गाडी चालवत पुढे गेलं की पुन्हा रस्ता आहे, नंतर पुढे कच्चा रस्ता आहे. लगेच शिंदीचे दोन चार दिवेही दिसू लागले.

रात्री साडेतीनच्या सुमारास शिंदी गावात पोहोचलो. छान थंडगार हवा होती.हा सगळाच परिसर अभयारण्य म्हणून घोषित करून ही गावे उठवली जाणार असे बरेच वर्ष घाटते आहे. शाळेच्या ओसरीत झोपायचे असा बेत होता, पण समोर जे घर दिसले त्याचे प्रशस्त अंगण बघून तिकडेच झोपलो. पहाटे सर्वांना उठवण्याची जबाबदारी असते तात्याची, सहाला उठलो. मुसळधार पावसाच्या या गावात पाणी असले तरी मुबलक नाही. साडेसातला निघायचे होते, पण वीस जणांचे आवरणे, आणि मग दोन चुलींवर तीन हप्त्यात केलेले पोहे असे सगळे होईपर्यंत साडेआठ झाले आणि आम्ही महिमंडणगडाची वात चालू लागलो, आल्या रस्त्याने थोड्या वेळ चालून मग जंगलात घुसायचे, एका स्मारकाच्या चौथऱ्याशी पोहोचलो की तिथून एक पायवाट थेट गडाकडे घेऊन जाते, आम्ही परत येता येता मनोज आणि किर्तीने वाटेवर व्यवस्थित दिशादर्शक बाणही लाल रंगाने रंगवून ठेवले आहेत.

दाट झाडीचे टप्पे असल्याने फारशी दमछाक होत नाही, नंतरची वाटही कातळाला बिलगून जाते त्यामुळे सकाळी तरी उन्हाचा त्रास जाणवत नाही. जसे जसे वर चढतो तसे उजव्या हाताला रघुवीर घाटाची खिंड दिसू लागते. मध्ये चार पाच ठिकाणी खोदीव पायऱ्या आहेत, प्रवेशद्वार पूर्ण भग्नावस्थेत आहे. महिमंडणगडावर दोन जोडशिखरे आहेत, त्यांच्या बरोबर मधोमध आपला गडावर प्रवेश होतो आणि समोर एकामागे एक अशा उत्तुंग डोंगररांगांचे दृश्य उलगडते. नेहमी येणारे, पहिल्यांदा आलेले, दमलेले असे कोणीही असले तरी तोंडातून उत्स्फूर्तपणे 'वा !' येणारच असे ठिकाण आहे.

डावीकडच्या शिखरावर थोडी अधिक जागा आहे, तिथे देऊळ आणि पाण्याची खोदीव सात टाकी आहेत, गडाचा इतिहास फारसा ज्ञात नसला तरी टाक्यांवरून प्राचीनपणाची खात्री पटते. टेहेळणीचा किल्ला असावा. माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. खालचे शिंदी गाव सर्व बाजूंनी उंच डोंगरांनी वेढलेले दिसते, एका बाजूला महिमंडणगड, वायव्येला चकदेवचा उत्तुंग पहाड आणि त्यावरची छोटी जंगम वस्ती, पूर्वेला पर्वत या नावाचाच पहाड आणि त्यावरचे देऊळ. पर्वतच्या मागे दिसणारा पहाड मधुमकरंदगड असावा असे वाटते. या पसाऱ्यातून वाट काढत थोडे दक्षिणेला गेले की आरव आणि मोरणी ही शिवसागराच्या काठावरची गावे लागतात, बोटीने यायचे तापोळा वा बामणोलीहून दोन तीन तास जलप्रवास करून या गावाला येणे आणि मग तासाभराची जंगलातून पायपीट असे करता येते. डोळे ताणून दक्षिणेला पाहिले तर पाटणच्या पठारावरच्या पवनचक्क्या दिसतात. उजवीकडच्या शिखरावरून आम्ही आलो तो रघुवीर घाट, खालचे खोपी गाव आणि त्याच्या लगतचा खोपी धरणाचा जलाशय असे सगळे दृश्य दिसते. गडाच्या पूर्व उताराला चांगला जंगलपट्टा आहे.

सर्व जण खाली उतरलो, पाण्याची सोय करायला बादल्या घेऊन जरा दूर विहिरीवर दोघे चौघे गेलो, आमची दोरी काही पुरेना, तिथल्या एक मावशी मग त्यांचा प्लास्टिकचा पोहरा आणि दोर घेऊन आमच्याबरोबर विहिरीवर आल्या तर धुमकेतू विहिरीच्या काठावर झोपून मग आत हात सोडून आमचा दोर पुरवायचा प्रयत्न करत होता. मावशींना फारच हसू आले, 'असं काढताय होय पाणी ? बाया नाही का बरोबर कोणी ?'  विचारायला लागल्या. मी एकदम गरीब चेहरा करून 'आहेत हो, पण आमच्या इकडे पुरुषांनाच सगळी काम करायला लागतात.' ते ऐकून त्यांचा चेहरा एकदम ऐकावे ते नवलच छाप झाला होता. मनाला पटेना आणि अविश्वासही दाखवता येईना. त्यांनी झर झर पाणी शेंदून दिल आणि ते घेऊन परत आलो तर पंकजने दोन चुली पेटवल्या होत्या आणि आरती, शीतल, नलिनी वगैरे जोरात रश्श्याच्या कामाला लागल्या होत्या, तर दिनेशने खिचडी शिजवायला घेतली होती. जेवणाचा कार्यक्रम मस्तच पार पडला.

चकदेवला जायचे असाही बेत होता, पण आधीच सकाळपासून उशीर होत गेला, त्यात एवढ्या लोकांची जेवणे आणि नंतर आवरणे यात वेळ गेलाच. पुन्हा पाणीही दुरून भरून आणावे लागणार होते. शिवाय काल रात्रीचा अनुभव लक्षात घेता, चालकांना फार रात्री गाडी चालवायला लावणे नको वाटत होते, म्हणून मग चकदेव आणि पर्वत पुढच्या वेळेसाठी ठेवून परत निघालो, वाटेत धुमकेतूच्या सासरी त्यांच्या अगत्यशील आदरातिथ्याचा अनुभव घेऊन आणि त्यांच्या मसाल्याच्या कारखान्यात एक चक्कर मारून वरंधा घाट मार्गे पुण्याकडे परतलो, वाटेत एक जीप कोसळून पडलेली पाहिली. रविवारीच पहाटे पहाटे चालकाचा डोळा लागल्यामुळे ती कोसळून त्यातले दहा बारा जण  ठार झाले असे नंतर कळले.  असे काही पाहिले-ऐकले की दुसरा गाडी चालवतोय आणि आपण त्यात बसलोय या गोष्टीची मला जास्तच भीती वाटू लागते.

रात्री अकराच्या सुमारास पुण्याला पोहोचलो. वीस जण असल्याने थोडे सहलीचे स्वरूप प्राप्त झाले, मजा आली, पण तरी पुढचे ट्रेक शक्यतो पाच ते आठ या संख्येचेच..