मी सांगणे दिले; सोडून यापुढे
तुमचे तुम्हीच घ्या; पाहून यापुढे
हे अर्थ-लेख, हे... चवदार आकडे!
ताटात हेच घ्या; वाढून यापुढे
"कंटाळतोस तू; अन्नास त्याच त्या... "
मी लाजवूच का... बोलून यापुढे?
मी दचकलो असा, हे कोण बोलले?
"ठेवू नका मला कोंडून यापुढे"
बेभान शब्द हे; मी आवरू कसे?
खुंटेल बोलणे, बोलून यापुढे...
गुण माणसा तुझे; आले हवेतही
तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे
सूर्यासवे नव्या; येती जुनेच ते -
टळतात प्रश्न का; जागून यापुढे...
मी काय शोधतो; ते आठवेचना!
शोधायचे कसे; शोधून यापुढे...