मनास केले असे मोकळे, क्षितीज उरले नाही

मनास केले असे मोकळे,  क्षितीज उरले नाही

जरी एवढा प्रवास केला, गाव शोधले नाही
मनास केले असे मोकळे,  क्षितीज उरले नाही

टपटपणाऱ्या आठवणींना तेव्हा बघून दारी 
भिजले मन  हे जराजरासे.. पण हळहळले नाही 

'उंबरठा  झाला पर्वत की रस्त्याने थांबवले?
भेटण्यास ना येण्याचे मज कारण कळले नाही

देठ मनाचा नाजुक तरीही, अजून आहे ताठ
(कोण म्हणाले मी सुमनांना, तोलून धरले नाही)

पहा कोपरा अस्तित्त्वाचा  झाडून मी टाकला 
पण  माझे घर  त्याने  अजून का चकाकले नाही?.

एका मनात घोळत  होता विचार काहीबाही....
पण दुसरे मन  पक्के  इतके, बिलकुल  चळले नाही
                                            
-सोनाली जोशी