.......................................
काहीतरीच काय...!
.......................................
'काहीतरीच काय ' म्हणालीस लाजुनी!
सुख कोणते असेल, मला सांग, याहुनी?
इतकेच बोललीस; पुढे शब्द थांबले...
अन् बोलके बनून तुझे मौन लांबले...
- सुचवायचे कळे न तुला काय यातुनी!
तिरपा कधी कटाक्ष; कधी ओठ मुडपणे...
लटकाच राग दाखवुनी नाक मुरडणे...
हे काय काय लाभ मिळाले, न मागुनी!
काहीतरी मनात पुन्हा योजलेस तू...
पाठीवरील केस पुढे ओढलेस तू...
डोळे मिटून घेत... जरा मंद हासुनी!
ही रेशमी; मधाळ पडे भोवती मिठी...
श्वासांत श्वास श्वास; दिठीला भिडे दिठी...
नाही नवीन; रीत तुझी हीच ना जुनी?
स्पर्शामधून स्पर्श... पुन्हा स्पर्श...हावरे...
संगीत मैफलीत जणू धुंद पाझरे...
लय सावकाश वाढवुनी... सूर साधुनी!
- प्रदीप कुलकर्णी
............................................
रचनाकाल - २७ सप्टेंबर २००८
..............................................