मायबोली संकेतस्थळावर नुकतीच एक गझल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती... त्यात 'नाही' हे अंत्ययमक दिलेले होते... त्या कार्यशाळेसाठी लिहिलेली ही गझल
"चार-चौघांसारखे जगणार नाही"
बोलणे सोपे! कृती जमणार नाही
जोडली आहे नभाशी नाळ माझी
मी कधीही पूर्ण कोसळणार नाही
वृक्ष आहे का असा बागेमध्ये - जो
पश्चिमी वाऱ्यांपुढे झुकणार नाही?
माणसे निष्क्रीय ही झालीत इतकी
थंड जितके प्रेतही असणार नाही
कोण चुकले, हे नको सांगू कुणाला
वाच्यता मी ही कुठे करणार नाही
व्यर्थ तू शोधू नको दाही दिशांना
तो जरी असला तरी दिसणार नाही
बोलते खोटे किती आयुष्य माझे
रोज म्हणते "मी तुला छळणार नाही"
घाव शेवटचा तरी घालू नको तू
मी तसाही फारसा तगणार नाही
एक वेडा बरळला चौकात परवा
लाल सिग्नलला मध्ये घुसणार नाही