तू नसल्यावर...........

वाहत जाती जखमा भळभळ तू नसल्यावर
आठवणींचा झराच खळखळ  तू नसल्यावर

तुझ्या सवे मी समीप असता कधी न कळली
अता ऐकतो हळवी सळसळ  तू नसल्यावर

सतत राबुनी दिले घराला घरपण जे तू
आज कळाली मजला तळमळ  तू नसल्यावर

सुतत वारा उठता वादळ वीज चमकते
विचार करता मनात खळखळ  तू नसल्यावर

तुझ्या समोरी कधी रुसावे कधी चिडावे
अता मुक्या अश्रुंची घळघळ   तू नसल्यावर

घरात कोणा दुखता खुपता तुझी धावपळ
तुझी आठवे आता कळकळ  तू नसल्यावर

व्याकुळ होतो जीव अता हा तव विरहाने
युगायुगांचा भासे पळपळ  तू नसल्यावर

रीत जगाची महती पटते मृत्यूनंतर
"सुनंदा"चीया मनात हळहळ  तू नसल्यावर

                                 ------प्रा. कु. सुनंदा वैद्य