कधीतरी चांदण्यात दोघे...!

....................................
कधीतरी चांदण्यात दोघे...!
....................................

कधीतरी चांदण्यात दोघे फिरायला जाऊ !
पुन्हा जुना काळ आपला तो स्मरायला जाऊ !

परस्परांची करू प्रतीक्षा समोर असताना...
चिडून घेऊ परस्परांवर उशीर नसताना...
तशातसुद्धा हळूच बिलगू समीप बसताना...
खुळे बनू एकदा... दिवाणे ठरायला जाऊ !

निवांत गुंफून हात हाती बसू जरा तेथे...
कथा-व्यथा विस्मरून साऱ्या हसू जरा तेथे...
नसू कुठेही जगात तेव्हा... असू जरा तेथे...
कधीतरी हे मनाप्रमाणे करायला जाऊ !

निळ्या सुखाने मिटून डोळे खुलू असे काही...
मनास आंदोलुनी नव्याने, झुलू असे काही...
फुलांप्रमाणे प्रसन्न होऊ... फुलू असे काही...
सुगंध प्राणांत मोगऱ्याचा भरायला जाऊ !

- प्रदीप कुलकर्णी

....................................
रचनाकाल ः १९ ऑक्टोबर २००८
....................................