पक्का मी शेंदाड शिपाई! कधीतरी पण घडते काही
बाहुंमध्ये आणि जरासे; जरासेच फुरफुरते काही
कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही
लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!
रोज साजऱ्या करतो माझ्या मनातल्या या क्षणिक दिवाळ्या
अंधारावर जळते, क्षणभर लखलखते अन... विझते काही!
मरणाची कोणाला चिंता? गुपित समजले अमरपणाचे
जगले जे नाहीच मुळी ते सांग कधी का मरते काही!