... आठवणींची शवे!

..............................
... आठवणींची शवे!
..............................

मेलेले मन; आठवणींची शवे घेउनी...
कुठे निघालो, काय काय मी सवे घेउनी?

झगमग, तगमग कोणासाठी ही रात्रीची?
लगबगीत ही... ओंजळीत काजवे घेउनी!

लाज कुणी राखेल... असे का तुला वाटते?
हिंडतोस तू जिणे तुझे नागवे घेउनी!

मैफलीत जातोस कशाला आनंदाच्या -
- दुःखा, तू ही तुझी शिळी आसवे घेउनी?

यायचेच तर अशीच ये तू मज भेटाया...
गतकाळाचा गंध पुन्हा ये हवे घेउनी!

अलामतीची गडबड आहे; यती भंगला...
थोर समीक्षक इथे किती! ताजवे घेउनी!

उदास दिवसाच्या काठावर क्षितिजामागे...
सांज उतरली खिन्न क्षणांचे थवे घेउनी!

किती किती करशील अशी माझी बदनामी?
कुठे कुठे जाशील मला बोलवे घेउनी?

प्रवास माझ्यासारखाच ना प्रत्येकाचा?
सदैव विस्तव; कधीतरी ताटवे घेउनी!

कवितेमधुनी मिळेल कीर्ती, मान, प्रसिद्धी...
काय परंतू करायचे हे, कवे, घेउनी?

दुकान अदलाबदलीचे... ही दुनिया म्हणजे...
जुने इथे फुकटात द्यायचे; नवे घेउनी!

- प्रदीप कुलकर्णी

..............................
रचनाकाल ः २ जानेवारी २००९
..............................