एकट्याचा मार्ग आहे, एकट्याने चालतो
मार्गही सोडेल सोबत, सत्य हेही जाणतो
जो दिसे तो आपल्या जागी दिसे मज एकटा
घोळके जमवून पण तो सत्य हे नाकारतो
नाळ बेडी, हार बंधन, पाश आहे रक्तही
देह घेतो भोग सारे, कैद आत्मा सोसतो
जेथुनी प्रस्थान केले ध्वस्त झाले ते नगर
जायचे होते जिथे वसलाच नाही गाव तो
खिन्न रस्ता बोलला, "अनिकेत का करतो असे? "
"अंथरुण करतो मला, स्वप्ने घराची पाहतो... "
ज्यास मी तुडवीत होतो तोच रस्ता बोलला
घे विसावा, बैस थोडा, पूस, बाळा, घाम तो
पाहिले आहेस का, कोहम्, चिपाडांना कधी?
भाव चरकातून शब्दांच्या, पहा, मी काढतो