जुनी हताश कल्पना नवीन वेष धारुनी मनास ठोठवून ओळ सांगते रचायला
नकार ऐकता रडून आठवाय लावते तिची जरूर केवढी असायची सुचायला
मनात त्याच भावना, व्यथा तशीच, कल्पनाविलास तोच, शब्द तेच, तीच माणसे सदा
प्रयोगशीलसा कवी, करून मिश्रणे नवी, दवा जगास चाटवी, धकाधकी पचायला
नवी पहाट आणते नवीन धाडसे, नवीन हार, जीत, शाप, पाप, पुण्य, संकटे नवी
नवीन ओळ सुन्न होत जन्मते, जुनी तिला बघून तोंड पाडते नि लागते खचायला
तसा कधीच मी उगाच मांड ठोकुनी नवीन ओळ ताण देत शोधतो असे मुळीच ना
मनास टोचुनी ऋतू सभोवती स्थिरावतात, पाहताच लागतात वेदना रुचायला
असेन माणसात मी म्हणून गप्प राहते तसे बरेच बोलके जरी मुळात काव्य हे
जरा कुठे हळूच एकटा चुकून राहिलो, लगेच लागते वसूल होत वचवचायला