नांदी

चंद्र पुनवेचा, असावी तीट वर काळ्या ढगाची
भूषवी डोळ्यास जैसी गर्द महिरप काजळाची

सागराच्या सोबतीने सोड, नौके, तू किनारा
उसळत्या लाटात त्याच्या धुंद नांदी वादळाची

सोसवे ना दाह विरहाचा, सख्या, येशील केव्हा ?
हा न गात्रांचा पुकारा, ही विनवणी काळजाची

तप्त केले, उजळले सर्वांग ज्याने कांचनासम
त्या तुझ्या स्पर्शास केवळ एक उपमा - पारसाची!

बोलला पाऊस पहिला मृण्मयीला चुंबताना
वर्षभर वेडावते मज आठवण मृद्-सौरभाची