तू दिलेल्या वेदना

तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही

भोगण्याचा शाप आहे नंदिनीला
आजही का आग प्रतिकारात नाही

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

उंबऱ्याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझा
आज पुरते दु:खही पदरात नाही

जयश्री