कुंकू

सूर्य एकाग्रतेने आग ओकीत होता.

उंचसखल भूभागावर वेटोळी घालून रेल्वेलाईन सरकली होती. डोक्यावरच्या चोचदार टोपीसारखा फलाट आपले पत्र्याचे चतकोर छप्पर उंचावून एका टेकडीवर उभा होता.

फलाटाच्या पायऱ्या चढून दामोदर वर आला. दीडची पॅसेंजर बहुधा लेट होती. कंटाळवाण्या चेहऱ्यांचे तुरळक घोळके मनाच्या समाधानासाठी रसरसत्या पत्र्याच्या सावलीत उभे होते.

गळ्याभोवती फासाप्रमाणे काचणाऱ्या दोरीखाली हाताची बोटे घुसवून दामोदरने लोंबणाऱ्या आलेपाकाच्या खोक्याचा भार थोडा हलका केला. पत्र्याखाली जाऊन "आलेपाक" अशी आरोळी घालायचा विचार त्याच्या मनात आला. तो काही काळ रेंगाळून आपोआप नष्ट झाला. घरून जेवून-खाऊन निघालेली माणसे हे खरे आलेपाकाचे गिऱ्हाईकच नव्हे. त्यांना हवी तंबाकू, विडी, सिगरेट. या वस्तूंचा पुरवठा करणारे बाळ्या शेंडगेचे खोपट माणसांनी भरले होते. त्यात घुसून एक चिमूटभर तंबाकू दाढेला धरण्याचा विचार दामोदरने कष्टाने झटकला. गेल्या महिन्याची सव्वासतरा रुपयांची उधारी झाली होती. बाळ्या अजिबात काही बोलला नसता, पण पावले तिकडे वळताच डोक्यात नानांनी "पाश उधारीचा, करी नाश स्वत्त्वाचा" असा ठेका धरला. मग दामोदरने डाव्या हाताच्या रिकाम्या तळव्यावर उजव्या हाताचा अंगठा उलटसुलट रगडला, दोन टाळ्या वाजवल्या, आणि काल्पनिक चिमूट दाढेला लावून त्याने हातांची बोटे कडाकडा मोडली. आज जेवण काय अगदी आकंठ झाले होते अशातला भाग नव्हता, पण चार घास तोंडातून सरकले की मग त्याला तंबाकूची तलफ येई.

त्या तलफेची अशी वासलात लावण्याचा त्याचा प्रयत्न पाहून फलाटाच्या मध्येच टळटळत्या उन्हात भंगारमालाच्या पोत्यावर विराजमान झालेली म्हातारी गंगी हसली. "का गा मास्तरा, तंबाकुची चिमटबी परवडंना जाली व्हय? " दामोदरचा पडका चेहरा पाहून तिनेच प्रश्नाची सोडवणूक केली. "खरं हाय बाबा, असल्या गरम्यातनं कोन खायाला बसलाय तुजा आलंपाक? पावसापान्याची मानसं खोकाया लागल्यावर तुजा धंदा हुनार आन आमी द्येवाचं नाव घ्येत बसनार" एवढे सांगोपांग विवेचन करून तिने कमरेचा बटवा त्याच्यापुढे धरला.

मगाचीच कृती आता भरल्याहाती करून दामोदरने चिमूट तोंडात सोडली. काळ्या कडक जर्द्यावर पुटावलेल्या चुन्याचा चटका त्याच्या गालफडाला जाणवला. समाधानाने मान उंचावून त्याने आभाळ न्याहाळून घेतले. आणि खाली रुळावर एक पिंक टाकून तो म्हातारीला म्हणाला, "म्हातारे, भंगार घालायला मारवाड्याकडे तू कशाला जातेस? आता घरात पोरगा आहे, सून आहे, गप पडावं की सावलीला. "

चोरट्यासारखी इकडे तिकडे नजर टाकून म्हातारीने खाजगी हताश सूर लावला. "कसचा गप पडतूस बाबा. बाप गेल्यावर पोराला पदराखाली धरून वाढिवलं त्याला आता नसती थेरं सुचायलीत. त्या जोशीमास्तराकडं जाऊन पोतंभर अर्ज खरडून झालं. म्हनतोय 'बक्कळ शिकल्याला हाय, असलं हलकं काम करायाचा न्हाई. चांगली नोकरी मिळंल आनी मग सुकात ठिवंन तुला'. पन ती नोकरी मिळंस्तंवर खायाचं काय ते सांगाया कुनीबी तयार न्हाई. जोशीमास्तर म्हंतोय कसा, 'म्हातारे, पोरगा पांग फेडील'. पांग कवा फिटत्याल ते फिटत्याल, पन रोजच्या भाकरतुकड्यासाटनं वनवनताना माजं नेसूचं फिटाया लागलंया. आनी सुनंचं काय सांगनार बाबा? रूपानं नकित्रावानी हाय. तिला मारवाड्याकडं कसं पाटवू? सवताच्या सुनंला सोडलं न्हाई त्या भाड्यानं! म्हनताना जातीया म्हातारी न काय.

"तुजी पावनी काय म्हंती बाबा? दिसली न्हाई कुटं. "

"नाही, आहे, घरीच आहे. तब्येत जरा बरी नव्हती तिची. "

बोचके पोटाशी घेऊन करारी चेहऱ्याने विनातिकीट प्रवासाला निघालेल्या सुशीलेला चेकरने एका कलत्या संध्याकाळी याच फलाटावर उतरवले होते. "चला बाई" एवढ्या तोटक्या आवाहनाने दामोदर तिला घरी घेऊन गेला होता. दोन महिन्यात तिचे नाव सुशीला आहे यापलिकडे दामोदरला तिची माहिती कळली नव्हती. रोज चूल पेटवण्याचा व्याप टळला एवढ्यावरच तो खूष होता. आलेपाक मात्र अजूनही तो स्वतःच ढवळीत होता.

"चल चल बाबा, गाडी येतीया जनू. जरा वझ्याला हात लाव. " म्हातारीने त्याला तंद्रीतून जागे केले. त्याने आणखी एक पिंक टाकली आणि म्हातारीच्या पाठीवर पोते चढवले. फुसफुसत आलेल्या गाडीत म्हातारीपाठोपाठ तोही चढला.

आणि तागासारख्या भरभरीत जून आवाजात आरोळी देत तो डब्यात हिंडू लागला. "हे SS आलेपाक. आठ आण्याला सर्दी खोकल्यावर डोकेदुखीवर रामबाण औषध आलेपाक. "

डकाव डकाव करीत गाडी हलली. उन्हाच्या झळा खिडकीतून झापडा मारू लागल्या. दामोदरच्या पायजम्याच्या खिशात थोडाफार खुर्दा खुळखुळला.

गाडीचा वेग मंदावला तशी तो दरवाज्यात गेला. बिरकेवाडीला गाडीचा थांबा अजून व्हायचा होता. पण फलाटाचे काम चालू असल्याने गाडी तिथे मंदावे. सरपटत्या गाडीतून दामोदरने चटकन उडी मारली आणि मागचा डबा पकडला. पुन्हा एकदा "आलेपाक SS. "

उन्हे कलू लागली. शहरगाव जवळ आले. साखरकारखान्याचे धुराडे क्षितिजावर आभाळाला काळपट खड्डा पाडताना दिसू लागले. दामोदरने खुर्दा मोजून घेतला. तीनेक किलो जोंधळे आले असते. शिवाय अदपाव तेल. त्यातूनही काही पैसे उरले असते. त्यांचा तंबाकू घेण्याची इच्छा त्याला अनिवार झाली. पण गेले दोन दिवस पांढऱ्या कपाळाने बसलेल्या सुशीलेचे स्मरण होताच तो गप्प बसला.

खरेदी आटपून तो परतीच्या गाडीत चढला. पण गाडी सुरू व्हायचे नाव घेईना. मग त्याने शिल्लक असलेला आलेपाक घेऊन सगळी गाडी चाळली. अजून रक्कम खिशात पोचली.

अंधार काजळासारखा झाला, पण गाडी तिथेच. 'आज इथेच मुक्कामाचा योग की काय देव जाणे' दामोदर पुटपुटला. करपट चेहऱ्याने कडकडीत जांभया देत तो फलाटावर बसून राहिला. मग नेहमी संध्याकाळी जाणारी बंगलोर मेल धडधडत गेली आणि अखेर पॅसेंजर हलली.

भिंगुळवाण्या शरीराने दामोदर फलाटावर उतरला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती.

त्याने कडी वाजवायच्या आतच सुशीलेने दार उघडले. तिच्या डोळ्यांवर मात्र अजिबात झोप नव्हती. सौम्य निर्धाराने ते डोळे चमकत होते.

दामोदरने पायावर पाणी घेईतो सुशीलेने मातकट काळी भाकरी आणि मीठमिरची घालून उकडलेला घोळाचा पाला अशी ताटं सजवली. तेलकट टोपी खुंटीला अडकवून सदरा काढत दामोदर ताटावर बसला. गटक गटक घास गिळू लागला.

भाकरी संपवून त्याने ताटाला नमस्कार केला आणि तो उठला.

तो हात धुऊन आला तेव्हा सुशीला ताटे आवरून चुलीतल्या निखाऱ्यांची चाळवाचाळव करीत बसली होती. मग कुठे त्याच्या लक्षात आलं की घोळाच्या पाल्याचा वाडगा तो येईपर्यंत निखाऱ्यांवर होता, आणि त्यामुळे जेवताना सुखद गरम वाटत होतं.

फाटकी सतरंजी उचलून तो बाहेर पडणार तोच सुशीला म्हणाली, "मला तुमच्याशी जरा बोलायचे आहे. "

दचकून तो भिंतीला टेकून उभा राहिला आणि घसरत खाली उकिडवा बसला. भिंतीवरची ढेकळे उघड्या पाठीवर घासून पाठ भगभगली. काचगोट्यांसारख्या डोळ्यांनी तो समोर पाहू लागला. हात वाकून जमिनीला टेकले आणि पाठीला आणखीनच बाक आला.

तिच्या आवाजात किंचित टोकदार तडफ होती.

"मी कोण, कुठली, काहीच माहीत नसताना तुम्ही मला आसरा दिलात. त्याबद्दल आभार मानणे अगदीच सुसरीच्या पाठीइतके खडबडीत ठरेल.

"तशी मी खूप लांबची. त्या खेड्यात आमचे एकुलते एक ब्राह्मणाचे घर. वडील मास्तर. आई म्हणून कुणी भरीव व्यक्ती माझ्या नजरेसमोर नाही. मला ठाऊक आहे ती अंधारात खाटल्यावर पडलेली, कापरासारखी कणाकणाने उडून जाणारी किडकिडीत बाई. होत होत एक दिवस तिचे प्राणच उडून गेले.

"माझी शिकायची हौस पाहून वडिलांनी मला शाळेत घेतले. मास्तरांची लेक शाळेला जाते हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला. माझे शाळेतले पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर गावातल्या चार भल्या माणसांनी धीर करून आपल्या मुली शाळेत घातल्या.

"घरचा पाश उरल्या नसल्याने दोन वेळचे जेवण करून ठेवण्याव्यतिरिक्त वडिलांचा घरात असा संपर्कच आला नाही. त्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी डोळे उघडे ठेवून शेती करावी, जमिनीसाठी नव्हे तर पिकासाठी पाणी वापरावे, लिहावाचायला शिकावे, सरकारी योजनांचा फायदा घ्यावा म्हणून कंठशोष करीत ते भयाभया भटकत असत. सदैव आभाळाकडे नजर लावून बसलेला शेतकरीराजा मात्र त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करीत होता.

"वयात आल्याची पहिली खूण शरीराने दाखवली आणि मी भेदरले. मिटल्या डोळ्यांनी निसर्गाला शरण गेले. तेव्हा मला आईचे चरचरीत आठवण आली. तिच्या खाटल्यावर तिचीच वाकळ पांघरून मी त्या अवस्थेत चार दिवस झोपून राहिले. आबा पदयात्रेवर होते.

"मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर आबांनी मला शिकायला शहरात धाडले. पदवी मिळाल्यावर तालुक्याला तात्पुरती का होईना, नोकरीही मिळाली.

"आबा निवृत्त झाली. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा तुकडा त्यांच्याच एका विद्यार्थ्याने तलाठ्याशी संगनमत करून लुबाडला आणि त्यांना कृतकृत्य केले. भ्रमिष्टासारखे आबा माझ्याकडे येऊन राहिले. त्यांची पेन्शन आणि माझा बराचसा पगार वकिलाच्या खिशात घालायला.

"मी जिथे नोकरीला होते त्या संस्थेने वर्षावर्षाची टांगती मुदतवाढ देत मला कायम 'तात्पुरते'च ठेवले.

"घरी आबा डोके थापटीत बसलेले असायचे. भसाड्या आवाजात मी कुठे जाते, काय करते याची उलटतपासणी घेत असायचे.

"अशा माणसाचे ओझे मी का वागवते आहे हे मलाच कळत नव्हते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू मी अनुभवल्याचे मला आठवत नाही. कुंद ढगाळ हवामान, आभाळात भरलेला पण न पडणारा पाऊस, सर्व आसमंतावर पसरलेला शेवाळी ओलसरपणा, आणि त्या कुबटपणात बुरशी चढत जाणारी मी, माझे सर्व दिवस असेच गेले. त्यात माझे लग्नाचे वय कधी उलटून गेले, शरीर कधी जुनावले, मला कळलेच नाही. आयुष्याचा जोडीदार ही माझ्या बाबतीत 'न देखली न ऐकली' गोष्ट होती.

"मला राठ करून अखेर आबा गेले.

"आमच्या संस्थेचे संचालकमंडळ बदलले. आबांचाच विद्यार्थी, त्या तालुक्याचा आमदार, आता अध्यक्ष झाला. लगेच मला भेटायला आला. कायम करण्याची खटपट करू म्हणाला.

"मग एका रात्री तालुक्याला सर्किट हाऊसवर बोलावून त्याने व्यवहाराचे बोलणे केले. त्याला माझे शरीर हवे होते. मग तो मला कायम करणार होता. आणि निसर्गनियमाने काही घडलेच, तर ते निस्तरण्याचीही त्याची तयारी होती.

"जातीयवाद गाडण्यासाठी निवडून आलेया त्या लोकप्रतिनिधीला ब्राह्मणाची बाई हवी होती.

"माझ्यालेखी हा व्यवहार ठीक होता. शरीरसुख, वासना, या गोष्टी नाहीतरी मला ओलांडून पुढेच गेल्या होत्या. माझ्या जाणीवेच्या कक्षेत नसलेली ती गोष्ट देऊन मी माझी श्वास विझेपर्यंतची तरतूद करू शकत होते.

"मी होकार दिला.

"आणि काही ओंगळवाण्या हिसक्यांसाठी माझी शरीर त्याला दिले.

"मला दिवस गेल्याची बातमी त्याला सांगायला जाताच त्याने बडतर्फीची नोटिस माझ्या हातात ठेवली.

"एव्हाना तो मंत्री झाला होता. त्याच्याशी झुजण्यात काहीच अर्थ नव्हता.

"गाठीच्या पैशांतून मी सगळी देणी भागवली. उरलेल्यातून येईल तेवढे तिकीट काढले. तिकिटाच पल्ला संपल्यावरही बसून राहिले, आणि इथे उतरवले गेले.

"मला चार महिने गेले आहेत. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे करायला मी तयार आहे. लग्न करायला तयार आहे किंवा इथून जायलाही तयार आहे. भूतदया म्हणून मला इथे ठेवण्याची सक्ती स्वतःवर करू नका. दुसऱ्याकडून काही अपेक्षा करायला मी कधी शिकलेच नाही. हाडं, कातडं, मांस, श्वास, पैसा. शेवटी सगळा रोकड व्यवहार. शब्दांच्या बुडबुड्यांनी या व्यवहाराचा तराजू केसभरदेखिल झुकत नाही. "

दामोदरच्या हातापायांतून झणझण मुंग्या नाचत होत्या. हात भिंतीवर आपटत तो उभा राहिला.

"'मला काही सांगायचे आहे' असे म्हटले की मला नेहमीच धडकी भरते. मंगळाची मुलगी म्हणून लग्न न जमलेली माझी माई अशीच एकदा भरभरून बोलली आणि मी झोपल्यावर गळ्यात दगड अडकवून रानातल्या विहीरीत पडली.

"तसले मात्र काही तुम्ही करू नका.

"तुम्हांला लग्न करावेसे वाटले, लग्न करा. तसेच राहावेसे वाटले, तसेच राहा. माझे नाना गेले तेव्हा गोवऱ्या आणायला कुणी चार आणे काढून दिले नाहीत. त्यामुळे आता कोण काय बोलेले याची किंमत बाळगायचे कारण नाही.

"शेवटी कळले ते एवढेच, या डावात हुकुमाच्या पानाला महत्त्व आहे. बिनहुकुमाचे पान, मग ते तुमच्यासारखे राणीचे असो वा माझ्यासारखे दुर्रीचे, हुकुमाच्या पानाची धार बघण्यातच खर्ची पडायचे. आता ते खर्ची पडेपर्यंत हातात धरायचे एवढेच आहे. "

सुशीलाचा चेहरा सौम्य झाला. नजर खाली वळली.

अवघडून जात दामोदरने पायजम्याच्या खिशात हात घातला आणि आणलेली कुंकवाची पुडी सुशीलेच्या हातात ठेवली.

दातांनी ओठ रगडून सुशीलेने हुंदक्याचा आवाज कोंडला, पण ती वादळातल्या झाडासारखी गदगदली.

कासवासारख्या निर्विकार चकाकत्या डोळ्यांनी दामोदरने ते पाहिले.

आणि पाठीला बाक देऊन, फाटकी सतरंजी उचलून, तो झोपण्यासाठी बाहेर निघून गेला.