ती जाता जाता हळुच स्पर्शुनी जाते-
एका क्षणात अवघे हिरवे
पिंपळमन सळसळते ।
ती जाता जाता टिचकी मारुनी जाते-
पारिजातकी चांदण वैभव
मातीवर टपटपते ।
ती जाता जाता टपली मारुनी जाते-
लगडली जांभुळकी वत्सलता
अपसुक भान हरपते ।
ती जाता जाता धक्का मारुनी जाते-
गगनास गुदगुल्या करणारी झावळ
स्वेच्छे मरणासही आलिंगते ।
ती फणकारत घोंघावत बेगुमान जाते-
ओली हिरवी लवचिक मृदुता
फिदिफिदी हासत टा-टा करते ॥