आज आनंदात राहू, पाहुया पुढचे पुढे
वास्तवे बाजूस सारू, पाहुया पुढचे पुढे
मी नको आहे तुला हे माहिती आहे मला
एक छोटा जन्म काढू, पाहुया पुढचे पुढे
ढीग तक्रारी हिशोबांचे तुझे आणू नको
आज घे माझीच बाजू, पाहुया पुढचे पुढे
मी जसा होतो तशी झालीस तूही शेवटी
दोष दोघांचे उगाळू, पाहुया पुढचे पुढे
जीवना मी राहिलो तर चांगला वागेनही
आजचे ते आज पाहू, पाहुया पुढचे पुढे