तुझीच आहे चुकी, तुला मी म्हणायचो ना परोपरीने?
विवेक सुट्टा दिलास कोठे? शरीर आले बरोबरीने!
नशेत आहे तुझ्यामुळे मी, जबाबदारी तुझीच आहे
असेल किंवा नसेल माझा मलाच पत्ता, तुझ्या घरी ने
जिथून झाले सुरू तिथे पोचणे कुणालाच शक्य नाही
'कुठून झाले सुरू' सदा आठवेल जेथे, तिथे तरी ने
बनेल 'माझी' कधीतरी ती, असे मला भासवायची ती
खरेच आहे म्हणा! तिनेही बरेच केले तिच्या परीने
कुठे अता तू? कुठे अता मी? जुना जमाना विरून गेला
तुझ्यात मृद्गंध आणणे मी, भिजून जाणे तुझ्या सरीने
यशो-शिखर गाठलेच नाही, पुरी तयारी असून सुद्धा
अखंड मी चाललो अशाने, दिलाच नाही दगा दरीने
करून खांदे विडंबनांचे, पलंग पंडीत बिंग फोडी
बृहन्नडेच्या नकोत शाळा, खऱ्या शरांच्याच पंजरी ने
मृगास द्या हाकलून, मागा उन्हाकडे रंग पावसाचे
उन्हासही भाव येत गेला, विनोद आहे खरोखरीने!