तो-
नको आज पुन्हा पुराण्याच बाता; नको शब्द पुन्हा जुने फाटके,
नको युक्तिवादातुनी बांधलेले मनोरे फुकाचे, नको लाडके!
नको शब्द देऊ कशाचा मला अन नको आण मागू कशाची मला,
नको ऊत आणू शिळ्या त्या कढीला, नको तू म्हणू की ’गळा दाटला’
नको भोग देहास लाडावणारे, नको चुंबने गोड प्रेमातली...
जणू वासनांची पिसे लावलेली मनाला, पशूच्या पिसाऱ्यातली!
नको हुंदके कुंद मेघापरी ते, नको आसवांचाच पाऊस तो,
जयानेच बेरंगीले मैफलीला, नको राग पुन्हा तू गाउस तो...
कशाला कुणी हे म्हणाले कळेना, म्हणे- "प्रेम हे दान स्वर्गातले.. "
इथे यातनांना नसे अंत ऐसा, जणू भृंग ते पद्मबंधातले...!!!
कशाला फुकाचे उमाळे, उसासे.. नको शब्द जाळ्यात गुंफायला,
नको मोहपाशात देहार्पणे ती, नको रोज गुंत्यात गुंतायला...
"जगी सर्वसूखी असा कोण आहे? "- समर्थास झाले जरी ज्ञान हे,
खरे दु:ख त्यांना कळालेच नाही, न प्रेमास ज्यांनी कधी पाहिले!
म्हणालो ’अति’ मी जरा हे परंतु मला मुक्तता दे जराशी सखे...
नको प्रेम आता, नको प्रेम आता, नको प्रेम आता... नको लाडके!
ती-
अरे विश्व निर्माण केले जयाने, तयानेच केली खरी मेख ही,
अनामिक आकर्षणातील जादू, अरे राजसा तू जरा देख ही!
न एकातूनी एक निर्माण होतो, अरे सृष्टीचे गीत "दोघांतले"
नको संशयाला मनी देऊ थारा, अरे- प्रेम हे दान स्वर्गातले...!
नसे चुंबनांचा मला सोस आणि, न देहास माझ्या जरा वासना,
परंतु मनानेच केली सख्या रे, तुझी ’देव’ मानून आराधना !
उमाळे, उसासे तसा हुंदक्यांनी तुला वीट आला सख्या, जाणते
जरी भांडले मी तुझ्याशी तरीही, पुन्हा मी तुला आपला मानते..!
नको आसवांचा करू द्वेष माझ्या, कधी त्यातले भाव जाणून घे,
कधी घे मलाही जरासे उराशी, व डोळ्यातले नीर शोषून घे!
नको दूर जाऊ, जराशा चुका या, नसे हा गुन्हा खूप मोठा तरी-
पुन्हा प्रेम घे रे, पुन्हा प्रेम दे रे, पुन्हा येऊ दे पावसाच्या सरी...
............ पुन्हा येऊ दे पावसाच्या सरी!!
+++++++++++++++++++++++++++++++++++