दिवस आता काढण्यातच जीव जातो
नेहमीचे सोसण्यातच जीव जातो...
वाद काही मी कुणाशी करत नाही;
पण स्वतःशी भांडण्यातच जीव जातो...
प्राक्तनाला बदलणे तर शक्य नसते
अन स्वतःला बदलण्यातच जीव जातो...
कोणतेही 'तत्त्व' येथे सत्य नाही
हे जगाला पटवण्यातच जीव जातो...
काम जे हातात येते, निमुट करतो
चार पैसे जमवण्यातच जीव जातो...
काळजी वाटे मला ह्या कायद्यांची
नियम त्यांचे पाळण्यातच जीव जातो...
माजलेले रान आहे हे चराचर!
जीव येथे रमवण्यातच जीव जातो...
मी तसा मोडूनही असतो उभा, पण
फक्त माझा वाकण्यातच जीव जातो...
भासते हे तोकडे मज अंथरुण अन
पाय येथे पसरण्यातच जीव जातो...