साक्षात्कार -२

साहेब गेलेही.
काही काळ फक्त स्तब्धता. आवाज फक्त पंख्याचा, एसीचा आणि उघडलेल्या दाराचा. तरुण काहीसा अवाक... काहीसा अवघडलेला. शेवटी आबांनीच कोंडी फोडली.
"तुमची ऑफर आणलीय तुम्ही? "
"होय सर. टेक्निकल प्रपोजल, व्हायेबिलिटी रिपोर्ट आणि कोटेशन. तुमच्याच नावे आहे. "
"हं. " आबा एक क्षण विचारमग्न. "कितीची आहे ऑफर? "
"रफली एक कोटी चाळीस लाख, सर. पण त्यापासून तयार होणारा बायोगॅसच.. "
"अहो पण तुम्ही डिफेंड का करताय? " आबा गडगडून हसले. "मला आयडिया पाहिजे फक्त. कितीचं प्रपोजल आहे, काय आहे, कळायला नको? अहो, तुम्ही सोडून कोण बनवतंय असलं सगळं? "
तरुण आनंदात. "मग सर, मी दुपारी ऑर्डर घेतो आपल्या ऑफिसमधून. फॅक्स करतो. सँपल्स घेऊन संध्याकाळी लॅबला टाकतो, म्हणजे उद्याच इंजिनीअर आणता येईल साईटवर. "
आबा शांत. प्रज्ञावंताचं हसू आणि स्थितप्रज्ञाचा चेहरा स्थिरावला समाधीत. स्थितप्रज्ञ कसा असे?
संथ सुरात ते म्हणाले, "अशी घाईगडबड करायची नाही. अजिबात नाही. चार महिन्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत विचार होईल तुमच्या ऑफरवर. तेंव्हा बघू. मग पुढच्या वर्षीच्या सँक्शनमध्ये बसलं तर. एक मिनीट हां जरा.. " त्यांनी वाजणारा मोबाईल उचलला. "हां... श्रीपती, आला का गेस्ट हाऊसला जाऊन? दिले ना व्यवस्थित? काही प्रॉब्लेम नाही ना? बरं बरं.. रात्री नाही थांबत म्हणाले? मर्जी त्यांची. बाकी काही कुरकुर नाही ना?. ठीक. ठीक आहे, म्हणतो मी. "
त्यांची नजर पुन्हा तरुणावर स्थिरावली. "हां! तर.... काही गडबड नाही आहे आपल्याला. तुम्हाला वाटल्यास साईटवर चक्कर मारून या. बघू पुढंमागं सहा महिन्यानी... "
तरुण पूर्ण डेस्परेट. पावसात चष्मा पुसून झाला की दिसतं तसं स्वच्छ दिसायला लागलेलं. पण साला शेवटचा प्रयत्न करायला हवा. "पण चेअरमनसाहेब, त्यांनी उद्या रिपोर्ट करायला सांगितलंय. नाहीतर आपलंच उत्पादन थांबवू असं नाही का म्हणाले ते? मग... "
आबा जागेवरून उठले. अत्यंत मृदू आणि वात्सल्यपूर्ण असा हात त्यांनी तरुणाच्या खांद्यावर ठेवला. "तुम्ही कुठं त्यांचं बोलणं मनावर घेता? आं? आपल्याच डोक्याला त्रास होतो. आम्ही आहोत ना. अहो, सरकारी माणूस आहे. बोलतो. त्याचं कामच आहे ते. जास्ती महाग माणूस असेल तर जास्त बोलतो. आपणही त्यानुसार घेतलंय सगळं सावरुन. तुम्ही गेला तरी ते उद्या नाहीत ऑफिसला. .. टूरवर जाणारेत की हो ते! "
"पण सर... निदान त्या नदीतल्या टॉक्सिसिटीमुळं, डिझॉल्वड ऑक्सिजन.. "
तरुणाला मध्येच हातानं थांबवताना क्षणभरच आबांचे डोळे दगडी झाले. "ते बघतो आम्ही. तुम्ही या गावात नाही ना राहात? तुमच्याकडं आहे की महापालिकेचं पाणी. शुद्ध. मग झालं तर. ग्रामस्थांची आम्हालाही आहेच की काळजी! आमच्या काळज्या आम्हाला करू द्या. वाहतंच पाणी. नवीनच म्हणायचं ते. कुठं चार दोन बुडबुडे निघाले, फेस निघाला, हे, ते, तर काय हो एवढं? असू द्या. निघा तुम्ही. ऑफर किती दिवसांसाठी आहे - व्हॅलिड हो? "
"सहा... सहा महिने. "
""आं.... मग काय! एकदा सहा आठ महिन्यांनी तुमच्या व्हाईस प्रेसिडेंटना फोन टाकायला सांगा. काय कमीजास्त असेल ते बोलून घेऊ. राम राम. "
सदरहू तरुण विचारप्रवृत्त, अध्यात्मिक आणि शांत होऊन बाहेर आला. स्टँडर्ड झाडं डुलत वगैरे होती. वातावरण प्रसन्न. हवा छान होती आणि मधूनच त्या हवेला छेद देणारा गोड औद्योगिक वासही येत होता. नदीकडून येणारा, विकासयुक्त वास. मनात गुप्त स्वगत. पुन्हा. 'काय करावं? काय करावं आता? 'सिंहासन' मधल्या दिगूसारखं मोठमोठ्यांदा हसावं? पण त्याला निदान एक हात पसरणारा तरी समोर आला होता. आपल्यासमोर तोही नाही. मग काय करावं? याच सीन मध्ये नसिरुद्दीन, अमिताभ, नाना कसे वागले असते? '
विचार करता करता तरुण चालत राहिला̱. घंटांच्या किणकिणण्यासारखे लांबवर कुठूनतरी लहान मुलांचं मतिमंदत्व, भाजीपाला पिकवायला अयोग्य जमीन, मिनामाटा सिंड्रोम -असे शब्द वाऱ्याबरोबर जाणवले. पण ते कुठे ऐकले ते मात्र आठवेना.
'इतक्या सुसंस्कृत वाटलेल्या, बर्वे, लखीना यांच्या परंपरेची आठवण होणाऱ्या त्या प्रदूषणाच्या साहेबांना पर्यावरणाचं हे 'असं' महत्त्व कधी कळालं असेल? ट्रान्स्फर मागून घेताना? मग आपल्यालाच ते 'तसं' का नाही कळालं? आणि ते..̱ग्रामस्थ... कुठायत ग्रामस्थ? आणि शहरातले सगळे प्रेमी? प्राणीप्रेमी? पक्षीप्रेमी? ते कुठायत? का फक्त रविवारी येतात ते इकडे 'आऊटस्कर्टस' वर?
चालता चालता तरुण अचानक थांबला. संपूर्ण टोटलच त्याला व्यवस्थित लागली. झेनमध्ये यालाच साक्षात्कार म्हणतात.... सातोरी... समोरच एक लहान मुलांसाठी साबणाचे बुडबुडे काढायचं खेळणं विकणारा चालला होता. नदीत टॉक्सिक वेस्टचे बुडबुडे होते. ते काढणारे, कमवता कमवता पर्यावरण, निसर्ग असले शाब्दिक बुडबुडे काढत होते. आपण निदान हे साबणाचे बुडबुडे काढावेत. हीच ती आसपासच्या परिस्थितीशी आत्मसाक्षात्कारी एकतानता! झेन सातोरी!
विकत घेतलेल्या खेळण्यातून अत्यंत अचूक, काळजीपूर्वक तो रंगीबेरंगी बुडबुडे काढत राहिला. त्याला हसणाऱ्या शेंबड्या पोरांकडे लक्ष न देता. कितीतरी वेळ...
(संपूर्ण)