विनोदबुद्धी...!

विडंबकाच्या प्रतिभेबद्दल घेतल्या जाणाऱ्या शंकेबद्दलचे हे काव्य आहे. तमाशातल्या सवाल-जवाबाची चाल.

काही अज्ञ जीव ब्रह्मदेवाकडे गेले आणि बुद्धीच्या प्रकारांबद्दल त्यांनी विचारले.....!!

प्रश्न :
बुद्धीचे तुम्हि प्रकार सांगा, तुम्हि देवांचे पितामहऽऽऽ अऽऽऽ ।
कुणामधें आढळे कोणता, हेही सांगा आज आम्हा, जी जी रं जी ॥

उत्तर:
कल्याणाच्या तुमच्या प्रश्ना कल्याणाचे उत्तर हे
ह्या ज्ञानाचे पाणी फोडो अज्ञानाचे फत्तर हे !

प्रज्ञा, मेधा, प्रतिभा ऐशा तीन प्रकारे नटलेली-
-बुद्धी आहे, गुणवंतांनी शास्त्रांमध्ये म्हटलेली ॥

प्रत्येकीचा गूण सांगतो, कुणात कुठली हेहि पुढे
अवधानाने ऐका, काढा शंकांचे बाजूस खडे ।

प्रज्ञा म्हणजे विचार करणे '' कार्या कारणभाव कसा? ''
जागृत म्हणती ठिकाण, तिथल्या दगडामध्ये देव कसा?

मेधा म्हणजे असे धारणा भवतालीच्या चित्राची
हीच धारणा ओळख ठरवी शत्रूची अन̱ मित्राची ।

प्रतिभा म्हणजे जिथे नांदतो नित्य नवासा उन्मेष
सजीवतेचा, पूर्णपणाचा एक अनावर जल्लोष ॥

प्रतिभा म्हणजे थाप डफाची, कवी, शाहिरा चेतवते
प्रतिभा बिजली लखलखणारी, क्षणात येते क्षणि जाते ।

प्रज्ञा-मेधा नुसते पाणी, प्रतिभा म्हणजे जीवन हो
प्रज्ञा-मेधा देहच, प्रतिभा प्राणांचे संजीवन हो ।

प्रज्ञा-मेधा थोड्या फरके आढळती की सगळ्यात
प्रतिभा म्हणजे 'हंस अकेला', कसा दिसावा बगळ्यात?

-----------------------------------------
प्रः
उत्तर कळले,शंका मिटली, अजून एकच प्रश्न मनी
'विडंबकाला असते का हो प्रतिभा? ' सांगा हेच झणी ।

उ :
बुद्धीच्या ह्या तीन प्रकारी, प्रतिभा असते कविजवळी
विडंबकाला त्याही ऊपर, 'विनोदबुद्धी' करि जवळी ॥

हा बुद्धीचा प्रकार चौथा, फटाक्यातली वात जशी
म्हाताऱ्याची ओढे दाढी, खट्याळ अवखळ नात जशी ।

कवीस केवळ प्रतिभा पुरते, विडंबकाचे तसे नसे,
प्रतिभेसोबत विनोदबुद्धी रसरसलेली हवी असे ।

मीच निर्मिली विनोदबुद्धी, जीवन सुखकर करण्याला,
धकाधकीचा इथे मामला, बुढ्ढा करतो तरण्याला ।

विनोदबुद्धी असता, हसती लोक, विसरती दुःख त्वरे
प्रतिभे पेक्षा आनंदाचे हेच शाहिरी बीज खरे !!

म्हणून प्रतिभा-विनोदबुद्धी असा प्रीतिचा संगम हा
कळणाऱ्याला ठाव कळे, पण अतिशहाण्याला दुर्गम हा । जी जी रं जी.. जी जी रं जी !!!

*****************************************************************