माझी व्यायामकथा

माझा षष्ठ्यब्दपूर्ती समारंभ माझ्या दोन्ही मुलांनी मोठ्या दिमाखात कार्यालय घेऊन साजरा केला‌अमारंभास नातेवाईक, स्नेही, मित्रगण असे बरेचजण हजेरी लावून गेले. अतिशय नेटक्या व हृद्य समारंभाने मी गहिवरून आलो. प्रत्येकानी पुढील आयुष्यासाठी शुभचिंतन करून मला हळुच
प्रश्न विचारला, " काय, नानासाहेब, आपण आजारी होता काय? एवढी प्रकृती कशाने खराब झाली?
मला तर कसलाच त्रास होत नव्हता. पण ज्याअर्थी प्रत्येकजण माझ्या प्रकृतीबद्दल विचारत आहे तर एकदा डॉक्टरला दाखवून यावे असे ठरवले. समारंभ आटोपल्यावर मी माझ्या डॉक्टर भाच्याला दाखवल्यावर त्यानी मला रक्ततपासणी करून घ्यावयास सांगितले. मी हॉस्पिटल मध्ये जावून माझ्या रक्ताची व मूत्राची तपासणी करून घेतली.
या रक्ततपासणी मध्ये मला मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले. माझ्या रक्तात साखरेचे प्रमाण ४३३ एमजी/ ग्रॅम असे होते. मूत्रातही साखर दाखवली होती. मी तो रिपोर्ट घेवून भाच्याकडे गेलो. रिपोर्ट पाहून त्याने मला हेवी मधुमेह असल्याचे सांगितले व एका मधुमेह तज्ञाकडे पाठवले.
त्या डॉक्टरने मला विचारले, " तुम्हाला चक्कर येते का? " मला कसलाच त्रास होत नसल्याने मी तसे सांगितले. त्यावर ते म्हणाले, " वयाच्या
साठ वर्षापर्यंत तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे जगलात. गोड पदार्थ खाल्लेत. मात्र आता जगावयाचे असेल तर गोड खाणे एकदम वर्ज्य करणे भाग आहे. तसेच शरीरास नियमित व्यायामाची गरज आहे. तरी रोज सकाळी एक तास तरी फिरावयास जात जा. " त्यांचा सल्ला ऐकून मी हादरलोच. कारण मला मधुमेह आहे हे माहितच नव्हते. पण आता खाण्यावर बंधने आली. मी पण कटाक्षाने ती बंधने पाळू लागलो. मी डॉक्टरकडून या रोगासंबधी अधिक माहिती करून घेतली.
एक महिन्यानंतर व्यायाम व औषधे यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण २३३ एमजी/ग्रॅम इतके खाली आले. पण ते अजून खाली म्हणजे
१५० एमजी/ग्रॅम च्या खाली आणावयाचे होते व टिकवावयाचे होते. आत्तापर्यंत माझ्या नातेवाईकांना समजले होते की मला मधुमेह आहे. मग सर्वजण आपापल्या अनुभवाप्रमाणे वेगवेगळी औषधे सांगू लागले. पण मी ऐकावे जनाचे व करावे मनाचे या उक्तीप्रमाणे वागायचे ठरवले.
मी नियमित व्यायाम व औषधे घेत होतो. तसेच ठराविक जेवण घेत होतो. तरीपण रक्तातील साखरेत तसा फारसा फरक पडत नव्हता. डॉक्टर
औषधाचा डोस वाढवून देणार होते. एवढ्यात एक घटना घडली व माझे जीवनच बदलले. त्याचे काय झाले, एक दिवस माझ्या घरी माझी मोठी
बहिण आली. ती म्हणाली, " कमलाकर, तुला मधुमेह आहे तर तू आमच्याबरोबर व्यायामशाळेत व्यायामास का येत नाहीस? फिरण्यापेक्षा
तेथील व्यायाम जास्त फायद्याचा आहे. शिवाय या व्यायामशाळेत ज्येष्ठ नागरिकांना सवलतीत प्रवेश आहे. महिना फक्त शंभर रुपये एवढीच फी आहे." मी प्रथम त्या विचारास नकार दिला. कारण व्यायाम शाळेत ज्येष्ठ नागरिकाचे काय काम? व्यायाम करणे तरुण लोकांची मक्तेदारी आहे. पण बहिणीने आपला हेका सोडला नाही. ती म्हणाली, " ठीक आहे. तुला यायचेच नसल्यास मी जबरदस्ती करणार नाही. पण तुला एकदा माझ्याबरोबर व्यायामशाळेत येऊन जाण्यास काय हरकत आहे? तिचे म्हणणे मला पटले. मी तिच्याबरोबर एक दिवस व्यायामशाळेत
पाहण्यासाठी गेलो.
व्यायामशाळेचा परिसर अतिशय निसर्गरम्य व शांत होता. आत शिरल्यावर मनाला एक प्रकारची प्रसन्नता येते. निदान मी तरी त्या वातावरणाने भारला गेलो. मग आम्ही व्यायामशाळा पाहण्यास आत गेलो. आत पाहतो तो काय, माझ्या कल्पनेला एक प्रकारचा मोठा धक्का बसला. आत चक्क वयस्कर लोकापासून तरुण लोकापर्यंतचे स्त्रीपुरुष एकत्र मन लावून व्यायाम करीत होते. मला खूपच कुतुहल वाटले. मग मी तेथील संचालकाला थोडी माहिती विचारली.
प्रश्न- या व्यायामशाळेचे सभासद कोणाला होता येते?
उत्तर- ज्याला मनापासून व्यायाम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांना सभासद होता येते.
प्रश्न- आपल्या व्यायामशाळेत स्त्रीपुरुष एकत्र व्यायाम करताना दिसतात ते कसे?
उत्तर- हल्लीच्या युगात स्त्री पुरुष असा भेदाभेद करण्याचे दिवस संपले आहेत‌त्री व पुरुषाच्या कुठल्याही स्नायूत फरक नसतो. त्यामुळे एकत्र व्यायाम करणे वावगे नाही. शिवाय या बद्दल कोणाचीच तक्रार नाही.
प्रश्न- आपल्या शाळेची वेळ काय आहे? बॅचेस वगैरे आहेत काय?
उत्तर- व्यायामशाळेची वेळ सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत व दुपारी ४ पासून संध्याकाळी ७: ३० वाजेपर्यंत अहे. कुठल्याही बॅचेस नाहीत. या
वेळेत ज्याला जसे जमेल तसे व्यायाम करून जावे.
प्रश्न- व्यायामशाळेचा सभासद होण्यासाठी कांही अटी आहेत काय?
उत्तर- मुख्य अट म्हणजे नियमित व्यायामास येण्याची. दूसरी अट म्हणजे आपणास कांही आजार असल्यास आपल्या डॉक्टरचे सर्टिफिकीट
आमच्या छापिल अर्जानुसार आणावे लागते. आपणास कोणता आजार आहे व त्यावर आपण काय औषधे घेत आहात याची नोंद असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आजार आहे त्याप्रमाणे व्यायाम आखता येतो.
प्रश्न- मला फी किती भरावी लागेल?
उत्तर - ज्येष्ठ नागरिकांना महिना शंभर रुपये भरावे लागतील.
मला त्यांचे म्हणणे पटले व मी त्या व्यायामशाळेचा सभासद झालो. आज मला चार वर्षे झाली आहेत. मी रोज एक तास व्यायाम करतो. मला एक दिवस व्यायाम केला नाही तर चुकल्यासारखे वाटते. व्यायामामुळे तुमच्या शरीरात ताकद येते. लवचिकपणा येतो. तुम्ही आनंदी व समाधानी राहता. मनांत वाईट विचार येत नाहीत. माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण आता नॉर्मल म्हणजे १२५एमजी/ ग्रॅम इतके कायम टिकले आहे.