अजुनही मला आवडेल

अजूनही खरं म्हणजे आवडेल मला तसं वागायला;

जीवाभावाच्या मित्रांबरोबर कट्ट्यावर बसायला;

आभाळाच छत अन् स्वप्नांच क्षितिज;

त्याच्या पाठीमागे वेड्यासारखं धावायला.

शिक्षकांना काहीच येत नाही म्हणून;

कॉलेजला दांड्या मारायला;

सगळं जग माझंच आहे म्हणून;

सिकंदरी थाटात वागायला.

स्वतःच आयुष्यं न समजलेल्या वयात;

मित्रांच आयुष्य सावरायला;

हळव्या मनावर झालेच आघात;

तर अगदी मनसोक्त रडायला.

पडलेच आयुष्यात अवघड प्रश्न;

तर मित्रांबरोबर सोडवायला;

वर आपल्या दोघांचंच हे गुपित हं ;

म्हणून एकमेकांना शपथा घालायला.

व्हायचंय आता दूर आपल्याला;

म्हणून क्षणाक्षणाला हुरहुरायला;

कितीही वाईट वाटलं तरी;

पुन्हा भेटू म्हणून वेडी आशा दाखवायला.

काळ बदलला; संदर्भ बदलले;

तरी माझा लाडका कट्टा आठवायला;

निरोप घेताना भेटलेल्या डोळ्यांची;

आठवण  भरल्या डोळ्यांनी काढायला.