बा उत्साहा, तुला विनंती,
सदैव राही मज सांगाती!
तुझ्या संगती अनेक येती,
मजला लाभे गुणसंपत्ती!
जिज्ञासा तर तुझीच भगिनी,
प्रसन्न मजवर ज्ञानदायिनी!
प्रतिभा-प्रज्ञा रचिती सृष्टी,
वरदानाची करीत वृष्टी!
शौर्य-धैर्य बंधू दोघे,
सहाय्य करण्या तत्पर अवघे!
मनात माझ्या नवी भरारी,
कर्तव्याची गुढी उभारी!
व्ययामाची रीत कळावी,
स्फुर्तीला मग भरती यावी!
बिकट प्रसंगी युक्ती सुचावी,
अपदा-विपदा सहज टळावी!
आरोग्याने देह फुलावा,
आशावादी इथे खुलावा!
यश-कीर्तीचा स्पर्श आगळा,
सुखवित जाई हर्ष मनाला!
उत्साहाची किमया सारी,
अजब दाविते दुनिया न्यारी!