हेचि फल --- !--२

          मीता आणि विशालचे लग्न होऊन दोन वर्षे झाली .पपाजींच्या निवृत्तीमुळे मा पपाजी दोघेही विशालकडेच रहात होते आणि स्वाभाविकच आता नातवंडाचे तोंड पहाण्याचे वेध दोघांनाही लागले होते.मीताची त्याला तयारी नव्हती कारण तिच्यामते विशाल आणि तिला नोकऱ्या व्यवस्थित संभाळून जर मा पपाजींकडे लक्ष द्यायचे असेल तर आणखी कोणतीही जबाबदारी वाढवायला नको आणि विशाललाही तिचा दृष्टीकोण चुकीचा वाटत नव्हता.दोन वर्षे त्या दोघांनीही अशीच ढकलली,पण विशालच्या माजीना काही हे पटत नव्हते.मी किंवा विद्या कधीही त्यांच्याकडे गेलो की त्यांचा हाच आग्रह असायचा,"जरा मीताको समझाइये"
    शेवटी त्यांच्या या भुणभुणीस वैतागूनच मीताने एक मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि  तिला दिवस गेल्यावर तिचे किती कौतुक करू असे माजींना झाले.नातवंड मग ते मुलगा असो नाहीतर मुलगी माजी खूष होत्या पण पपाजींचे मात्र तसे नव्हते मूल होणार म्हटल्यावर त्यानी विशालकडे  आणखी एक आग्रह धरला आणि तो मात्र मान्य करणे मीताला मुळीच मान्य नव्हते.त्यांच्या मते एकच मूल व्हायचे असेल तर मग तो मुलगाच हवा आणि त्यासाठीच सोनोग्राफी करून मूल मुलगा होणार की मुलगी हे पहाण्याचा त्यांचा आग्रह होता.विशालने ही गोष्ट मीताच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करताच ती एकदम उसळून म्हणाली 
 " नाही नाही नाही ते शक्य नाही "
" लेकिन क्यो ?" मीताचा ठाम नकार ऐकूनही विशालने आपला आग्रह न सोडण्याचा प्रयत्न करीत म्ह्टले.
" वही सवाल मैभी पूछूंगी की की ये टेस्ट किसलिये. नातवंड हव ना त्याना मग मुलगाच हवा हा आग्रह अशाला ?"
" केवळ पप्पाजीना बरे वाटावे म्हणून !"
"विशाल, तुला हे ऐकून वाईट वाटेल पण खर सांगायच म्हणजे केवळ त्यांच्या आग्रहामुळेच मी आता आहे त्या परिस्थितीत आहे नाहीतर माझी या बाबतीत काय मते आहेत हे तुला माहीत आहे.तेव्हां आता आणखी त्यांचे काहीही ऐकायची माझी इच्छा नाही " 
" पण तपासणी करून गर्भाचे लिंग समजून घेण्यात काय चूक आहे ?"
" विशाल,हे तू मला विचारतोस? एक म्हणजे ही गोष्ट बेकायदेशीर आहे आणि ती माझ्या तत्त्वात बसत नाही आणि दुसरे म्हणजे समजा गर्भ स्त्रीलिंगी असेल तर पपाजींचा काय आग्रह असेल हे मी काही तुला सांगायला नको आणि त्याला तर माझा ठाम विरोध असेल "
"यू आर राइट मीता,मी पण या बाबतीत पूर्णपणे तुझ्याच बाजूने आहे."
" हे पहा विशाल ,मी तुला चांगली ओळखते.आता त्यांच्या आग्रहासाठी गर्भजलचिकित्सा करू म्हणतोस तसाच तो गर्भ जर मुलीचा असेल तर त्यांच्याच आग्रहासाठी नष्ट करू असेही म्हणायला तू कमी करणार नाहीस.त्यामुळे याच पायरीवर आपण त्यांना थोपवायला हवे."
           या बाबतीत तरी कोणालाच भीक घालायची नाही याबद्दल ती अगदी ठाम होती. तिचे प्रसूतितज्ञ डॉ.विश्वास यानीही  तिला खूप पटवण्याचा प्रयत्न केला. त्यानी तिला असही सांगितले सांगितले की गर्भाचे लिंग कोणतेही असले तरी मा पपाजींना तो मुलगाच आहे असे ते सांगतील पण ही गोष्ट तर  मीताला मुळीच पसंत नव्हती.तिने त्यांना निक्षून  बजावले की असे खोटे सांगायला तिचा ठाम विरोधच राहील. मुलगी असली तरी गर्भपात करावा लागणार नाही या त्यांच्या शब्दावर तिचा विश्वास होता पण मग गर्भाचे लिंग पहाण्याचे कारणच काय असा तिचा सवाल होता.पण मा,पपाजीनी डॉ.विश्वासच्या समोरच आमच्याकडून असा कोणताही आग्रह रहाणार नाही असे सांगितले .त्याचबरोबर हेही सांगितले की  मुलगा अगर मुलगी हे कळल्यास आमच्या घराण्यात काही विधी करावे लागतात.पूर्वी या चिकित्सेची सोय नव्हती तेव्हां दोन्ही प्रकारचे विधी करावे लागत पण आता ही सुविधा आहे तर दोन्ही विधी करण्याची  यातायात कशाला असा विचार तिच्यापुढे मांडल्यावर नाइलाजाने  ती गर्भजलचिकित्सेला तयार झाली.
     चिकित्सेनंतर ती घरी येताच मापपाजी जणु तिची वाटच पहात होते. त्याना हवा असलेला निकाल तिच्या तोंडून ऐकायला ते उत्सुक होते पण मीताने त्यांची निराशा केली," माजी लडकीही होनेवाली है " 
     "अच्छा अच्छा हमे उसमेभी खुसी है "मापपाजींच्या तोंडून हे शब्द ऐकून मीताला आश्चर्याचा धक्काच बसला.
"लडकीही सही हम पोतीकोही पोता मानेंगे."पण मग   मुलगा होणार असेल तर काही उपचार तर मुलगी होणार असेल तर दुसरे काही उपचार करण्याविषयी आधीच त्यांनी सांगितल्यामुळे डॉ.विश्वास करीत असलेले उपचार इमानेइतबारे करून घ्यायला केलेला त्यांचा आग्रह तिला मान्य करावा लागला.
       दिवस राहिल्यावरही रजा काढून घरात बसण्याची मीताला आवश्यकता वाटत नव्हती आणि तिचा तो पिंडही नव्हता. शिवाय आपली तब्येत अगदी ठणठणीत आहे याची तिला खात्री होती,अगोदर सांगितल्याप्रमाणे काही विधी तिचा असल्या गोष्टींवर विश्वास नसूनही केवळ त्याना बरे वाटावे म्हणून तिने करून घेतलेही.पण तरीही डॉ.विश्वास यानी दिलेली औषधे तिने घ्यावीत असा आग्रह मापपाजी का करत होते ही गोष्ट तिला समजत नव्हती. शिवाय ती स्वत: फार्मसीतील डॉक्टरेट असल्यामुळे त्यांची औषधे ही गर्भारपणात घेण्याची नाहीत एवढे तिला निश्चितपणे कळले त्यामुळे एक दिवस तिने डॉ.विश्वासनाच विचारले,
"डॉक्टरकाका,तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू?"
"बोल बाळ अवश्य विचार "
" मग ही जी औषधे मला घ्यायला आपण सांगत आहात ती कसली आहेत हे मला कळू शकेल का?"
" हे काय विचारतेस मीता तुझी प्रसूति सुरळीत व्हावी म्हणूनच सगळे चालले आहे ना,मग ही औषधे हाही त्याचाच एक भाग आहे."
" अस्सं ? पण डॉक्टरकाका मी जरी मेडिकलची डिग्री घेतली नाही तरी फार्मसीच्या माझ्या अभ्यासानुसार ही औषधे प्रेग्नन्सीत घेण्याची नाहीत एवढे मला नक्की माहीत आहे. त्यामुळे ही औषधे मी कशासाठी घ्यायची हे कळल्याशिवाय मी ती नाही घेणार "
   आता मात्र नाइलाज होऊन डॉक्टरांना खरे काय ते सांगावेच लागले.
"मीता कदाचित तुझा विश्वास बसणार नाही पण मी स्वत: काही संशोधन करून गर्भाचे लिंग बदलण्यासाठी काही औषधे सिद्ध केली आहेत.अर्थातच ती अगदी वेगळ्या प्रकारची आणि नेहमीच्या पठडीत न बसणारी आहेत.मी त्यांचा प्रयोग तुझ्यावर करावा असा विशालच्या पपांचा आग्रह आहे."
"आणि ही गोष्ट मला सांगणे तुम्हाला आवश्यक वाटले नाही? थोडक्यात अशी सिद्ध न झालेली औषधे वापरून पहायला गिनीपिगसारखा तुम्ही माझा उपयोग करणार आणि तेसुद्धा मला पत्ता लागू न देता मला हे मुळीच मान्य नाही."
"मीता माझ्यावर विश्वास ठेव.यातील एकही औषधी द्रव्य तुझ्या किंवा बाळाच्या तब्येतीवर प्रतिकूल परिणाम करणार नाही याची खात्री मी देतो. "
     मीताने त्यावेळपुरती माघार घेतली तरी विशालसमोर तिच्या संतापाचा उद्रेक झालाच.आणि तिची समजूत घालताघालता त्याला नाकीनऊ आले शेवटी विशालने तिला विचारले,
" तुला यात काय अयोग्य वाटले ?तुला मूल नको असे तू म्हणालीस ते मीही मान्य केले पण आता मापपांच्या आग्रहाखातर जर मूल होऊ द्यायला तू तयार झालीस तर त्याना हवे असल्याप्रमाणे तो मुलगा होण्यासाठी त्यांच्या प्रयत्नात तुला साथ द्यायला काय हरकत आहे ? एरवीही  मुलगा किंवा मुलगी यापैकी काहीही झाले तरी तुला मान्यच होते आता डॉक्टरचाचांच्या प्रयोगामुळे जर मुलगाच होण्याची हमी असेल तर त्यात बिघडले काय ?तुला मुलगीच हवी असे तर तू  म्हटले नव्हतेस."
" हे बघ विशाल,अगोदर मला मूलच नको होते पण आता केवळ तुमच्या घरात मुलगाच हवा म्हणून  मुलगी होणार असे कळूनही तसे होऊ न देण्याच्या या प्रवृत्तीला माझा विरोध आहे."
" मीता I fully agree with your point  पण एक गोष्ट लक्षात घे मापपाजी मुलगा हवा म्हणून तुला ऍबॉर्शन कर अस तर म्हणत नाहीत एक निरुपद्रवी औषधी उपचार करायला तुझी संमती घेण्याची त्याना आवश्यकता वाटली नाही असे नाही पण त्याना तुझा स्वभाव चांगला माहीत आहे आणि त्यामुळे तू याला तयार होणार नाहीस असे त्याना वाटत होते त्यामुळेच डॉक्टरचाचांना त्यानी तसे सांगितले इतके होऊनही तुला ते उपचार करून घ्यायचे नसतील तर मी त्यांची समजूत काढतो आणि ते आपण बंद करूया पण त्यांची एवढी एक इच्छा तुला त्रास न होता पुरी करता येत असल्यामुळे त्याला विरोध तू करू नयेस असे मला वाटते."
    विशालचा युक्तिवाद पटला म्हणून म्हणा किंवा प्रत्येक बाबतीत आपल्या मुलीपेक्षाही अधिक मायेने आपल्याला जपणाऱ्या मापपाजींचा अपेक्षाभंग करणे अयोग्य वाटल्यामुळे म्हणा पण मीताने शेवटी डॉक्टरकाकांची औषधे घेण्याच्या मापपाजींच्या आग्रहाला मान्यता दिली.  
      आणि शेवटी ज्या दिवसाची डोळ्यात प्राण आणून मापपाजी वाट पहात होते तो दिवस उगवला आणि  आणि खरोखरच त्यांच स्वप्न खर झाल आणि मीतान एका सुंदर गुटगुटीत मुलाला जन्म दिला आणि पपांना अक्षरश: आकाश ठेंगणे झाले नातवाचे नाव काय ठेवायचे याविषयी अगोदरपासूनच खल चालूच होता . पपांना इतरांनी सुचवलेली कोणतीच नावे पसंत पडत नव्हती.कोणतेही नाव सुचवले की त्यात काहीतरी खोडी त्याना आढळायची. शेवटी संदेश,गगन,प्रद्योत,सुमेध अशी अनेक नावे ठेवण्यात आली त्यातले सुमेध जरी आवडले तरी शेवटी पपांचा तो पिट्टूच झाला.
क्रमशः